मुंबईतील झवेरी बाजारात 'ईडी’चे छापे; ४७ कोटींचे सोने, चांदी जप्त

मार्च २०१८ रोजी पारेख अॅल्युमिनेक्स लिमिटेड कंपनीच्या विरोधात मनीलाँड्रिंगप्रकरणी ‘ईडी’ला तक्रार प्राप्त झाली होती
मुंबईतील झवेरी बाजारात 'ईडी’चे छापे; ४७ कोटींचे सोने, चांदी जप्त

दक्षिण मुंबईतील झवेरी बाजार परिसरातील सराफा व्यापाऱ्यांच्या कार्यालयासह दुकानावर बुधवारी ‘ईडी’ने छापे टाकले. या कारवाईत ९१ किलो ५०० ग्रॅम वजनाचे सोने आणि ३४० किलो चांदी जप्त करण्यात आली आहे. जप्त केलेल्या सोन्या-चांदीची किंमत सुमारे ४७ कोटी रुपये इतकी आहे. याच प्रकरणात लवकरच काही सराफा व्यापाऱ्यांची ‘ईडी’कडून चौकशी होणार आहे.

मार्च २०१८ रोजी पारेख अॅल्युमिनेक्स लिमिटेड कंपनीच्या विरोधात मनीलाँड्रिंगप्रकरणी ‘ईडी’ला तक्रार प्राप्त झाली होती. या कंपनीने अनेक बँकांची फसवणूक केली होती. विविध बँकांकडून कर्ज घेऊन कंपनीने दोन हजार २९८ कोटी रुपयांचा बँकांना गंडा घातला होता. त्यानंतर कर्जाची ही रक्कम विविध कंपन्यांच्या माध्यमातून सुरक्षित कर्ज आणि गुंतवणुकीच्या विविध खात्यांत जमा करण्यात आली होती.मुळात कंपनीचा कर्ज घेण्याचा उद्देश वेगळा होता. कट रचून बँकेत कर्जासाठी अर्ज करून बँकांची फसवणूक करण्यात आली. त्यासाठी कोणतेही करार केले नव्हते. तक्रार आल्यानंतर गेले काही महिने ‘ईडी’चे अधिकारी संबंधित प्रकरणाचा तपास करीत होते. चौकशीनंतर या कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची जबानी नोंदविण्यात आली होती. या कारवाईत ‘ईडी’ने १५८ कोटी रुपये जप्त केले होते.

खासगी लॉकरची झडती

या संपूर्ण व्यवहारात मनीलाँड्रिंग झाल्याचे उघडकीस येताच ‘ईडी’ने बुधवारी सकाळपासून झवेरी बाजारात कारवाई केली होती. रक्षा बुलियनच्या आवारात ‘ईडी’ला काही खासगी लॉकरच्या चाव्या आढळून आल्या. या खासगी लॉकरची झडती घेण्यात आली. केवायसी आणि अन्य नियमांचे उल्लघंन करून तिथे संपूर्ण व्यवहार केले जात होते. विशेष म्हणजे, तिथे सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आला नव्हता.

लॉकरमध्ये येणाऱ्या लोकांची नोंद ठेवण्यात आली नव्हती. तिथे रजिस्टर असणे आवश्यक होते; मात्र कुठलेही रजिस्टर ‘ईडी’ अधिकाऱ्यांना सापडले नाही. तिथे ७६१ लॉकर होते. त्यापैकी तीन लॉकर रक्षा बुलियनच्या मालकीचे होते. याच लॉकरमधून या अधिकाऱ्यांनी ९१.५ किलो सोने आणि ३४० किलो चांदी जप्त करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in