मुंबई, केरळमधील पंधरा ठिकाणी ईडीचे छापे; अभिनेता दिनो मोरियाच्या निवासस्थानाचीही झडती, मिठी नदी घोटाळा

मिठी नदीतील गाळ उपसण्याच्या कामातील ६५ कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी मुंबईसह केरळमधील कोची येथे पंधराहून अधिक ठिकाणी छापे घातले. यात अभिनेता दिनो मोरिया याचे वांद्रे येथील निवासस्थान तसेच घोटाळ्यात सहभागी असलेले महापालिका अधिकारी आणि कंत्राटदारांच्या ठिकाणांचा समावेश आहे.
मुंबई, केरळमधील पंधरा ठिकाणी ईडीचे छापे; अभिनेता दिनो मोरियाच्या निवासस्थानाचीही झडती, मिठी नदी घोटाळा
Published on

मुंबई : मिठी नदीतील गाळ उपसण्याच्या कामातील ६५ कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी मुंबईसह केरळमधील कोची येथे पंधराहून अधिक ठिकाणी छापे घातले. यात अभिनेता दिनो मोरिया याचे वांद्रे येथील निवासस्थान तसेच घोटाळ्यात सहभागी असलेले महापालिका अधिकारी आणि कंत्राटदारांच्या ठिकाणांचा समावेश आहे. यावेळी मोठ्या प्रमाणावर आक्षेपार्ह कागदपत्रे हस्तगत करण्यात आली. या छापेसत्रामुळे महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मिठी नदीतील गाळ उपसण्याच्या कामात २००७ ते २०२१ या काळात कधीही न केलेल्या नदी सफाईकामाच्या बिलांमध्ये घोटाळा केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने महापालिका अधिकारी आणि कंत्राटदारांसाह १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात आर्थिक गुन्हे विभागाने दिनो मोरिया याची दोन वेळा चौकशी केली होती. त्यानंतर ईडीनेही मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत याच घोटाळ्याची चौकशी सुरू करत शुक्रवारी छापे घातले.

अभिनेता दिनो मोरिया याच्या वांद्रे निवासस्थानी आठ तासांहून अधिक काळ कागदपत्रांचा शोध घेण्यात आला. तसेच त्याचा भाऊ सॅनटीनो याचीही चौकशी करण्यात आली. गेल्या महिन्यात अटक करण्यात आलेल्या महापालिका अधिकाऱ्याच्या आणि त्याच्या भावाचा मोरिया बंधूंशी नियमित संपर्क होता, अशी माहिती तपासात उघड झाली आहे. त्याचप्रमाणे महापालिका अधिकाऱ्याच्या कांदिवली येथील घरासह अनेक ठिकाणांचा छाप्यामध्ये समावेश आहे.

विशेष ड्रेजिंग उपकरणे भाड्याने देणाऱ्या निवडक पुरवठादारांना फायदा व्हावा यासाठी निविदांमध्ये फेरफार करण्यात आल्याचा तपास यंत्रणांचा संशय आहे. अलिकडेच आर्थिक गुन्हे विभागाने महापालिका अधिकारी आणि केरळमधील एका कंत्राटदार कंपनीचा भ्रष्टाचार उघडकीस आणला होता. या प्रकरणाच्या दाखल असलेल्या गुन्ह्यात महापालिका अधिकारी, कंत्राटदार आणि गाळ काढणाऱ्या यंत्रांच्या चालकांसह तेरा जणांची नवे आहेत.

१२०० कोटींचा गैरव्यवहार

मिठी नदी गाळ काढण्याच्या कामात गेल्या वीस वर्षांमध्ये सुमारे १२०० कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. फेब्रुवारी महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या वीस अधिकाऱ्यांचे विशेष पथक या तपासकामासाठी स्थापन करण्यात आले होते.

logo
marathi.freepressjournal.in