‘पॅनकार्ड क्लब्स लिमिटेड’वर ईडीचे छापे; ४,५०० कोटींच्या 'फसवणूक'प्रकरणी कारवाई

पॅनकार्ड क्लब्स लिमिटेडशी संबंधित ४,५०० कोटी रुपयांच्या मोठ्या एकत्रित गुंतवणूक योजनांतील फसवणुकीच्या प्रकरणी सक्तवसुली संचालनालय (ईडी) ने २८ फेब्रुवारीला मुंबई आणि दिल्लीतील चार ठिकाणी छापे टाकले.
‘पॅनकार्ड क्लब्स लिमिटेड’वर ईडीचे छापे; ४,५०० कोटींच्या 'फसवणूक'प्रकरणी कारवाई
Published on

आशिष सिंग / मुंबई

पॅनकार्ड क्लब्स लिमिटेडशी संबंधित ४,५०० कोटी रुपयांच्या मोठ्या एकत्रित गुंतवणूक योजनांतील फसवणुकीच्या प्रकरणी सक्तवसुली संचालनालय (ईडी) ने २८ फेब्रुवारीला मुंबई आणि दिल्लीतील चार ठिकाणी छापे टाकले. सदर कारवाई सेबी कायदा, १९९२ आणि सेबी (CIS) नियमावली, १९९९ चे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून मनीलॉंड्रिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए)अंतर्गत करण्यात आली, अशी माहिती केंद्रीय एजन्सीने सोमवारी दिली.

छापेमारी दरम्यान, ईडीने विविध ‘साक्षीदार’ कागदपत्रे जप्त केली आहेत, ज्यात मुख्य आरोपी दिवंगत सुधीर मोरवेकरे, पॅनकार्ड क्लब्स लिमिटेडचे माजी संचालक यांच्या कुटुंबीयांनी सध्या चालवलेल्या परदेशी मालमत्तांचे तपशील आहेत. केंद्रीय एजन्सीच्या माहितीनुसार, हे मालमत्ते भाडे उत्पन्न निर्माण करत असल्याचे देखील आढळले.

या फसवणुकीत ५० लाखांहून अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यात आली, आणि यावर आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) मुंबई पोलिसांनी भारतीय दंड संहिता (IPC) आणि महाराष्ट्र ठेवीदारांच्या हिताचे संरक्षण (MPID) कायदा, १९९९ अंतर्गत गुन्हा दाखल केला.

पॅनकार्ड क्लब्स लिमिटेड आणि त्याचे संचालक यांच्यामार्फत गुंतवणुकीच्या विविध योजना राबविण्यात आल्या होत्या. तीन ते नऊ वर्षं कालावधीच्या या योजनांमध्ये गुंतवणूकदारांना ठेवींच्या बदल्यात हॉटेल डिस्काऊंट, अपघाती विमा आणि इतर फायदे तसेच अधिक व्याजाच्या परताव्याची हमी देण्यात येत होती. वचनबद्ध फायदे न मिळाल्यामुळे एका गुंतवणूकदाराने सेबीकडे तक्रार केली. सेबीच्या चौकशीत आढळले की, कंपनी आवश्यक मंजुरीशिवाय एकत्रित गुंतवणूक योजना (CIS) चालवत होती. परिणामी, SEBI ने कारवाई सुरू केली आणि कंपनीला सार्वजनिक निधी जमा करण्यास बंदी घातली आणि गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याचे निर्देश दिले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

परदेशी मालमत्तांची कागदपत्रे जप्त

धाडींमध्ये परदेशी मालमत्तांचा तपशील असलेली काही कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि कंपनीचे माजी संचालक दिवंगत सुधीर मोरवेकरे यांच्या कुटुंबीयांकडून सध्या या मालमत्तांचे नियंत्रण केले जात आहे. ही मालमत्ता भाडे उत्पन्न निर्माण करत आहे, अशी माहिती एजन्सीने दिली. काही कागदपत्रीय ‘पुरावे’ हाती लागले आहेत. त्यातून या मालमत्तांची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला गेला असल्याचे दिसून येते. आर्थिक गैरव्यवहारातील उत्पन्नातून या मालमत्ता निर्माण केल्या असल्याचे दिसून येते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in