अमली पदार्थ व्यापारी अली असगर शिराझीच्या घरावर ईडीचा छापा

अजूनही अन्य काही ठिकाणी छापेमारी करण्याचे ईडीचे काम सुरू आहे.
अमली पदार्थ व्यापारी अली असगर शिराझीच्या घरावर ईडीचा छापा

मुंबई : अमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणात ईडीकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. ईडीने ड्रग पेडलर अली असगर शिराझीचे घर आणि कार्यालयावर छापा टाकला आहे. अली शिराझी याने २०० कोटी रुपयांच्या ड्रग्जची युरोप आणि ऑस्ट्रेलियात तस्करी केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्यामुळे त्याच्याविरोधात मुंबईत ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे. अली असगर हा वाँटेड ड्रग्ज लॉर्ड कैलाश राजपूतचा जवळचा सहकारी सांगण्यात आले आहे.

प्राप्त माहितीनुसार, कुरिअर सेवेचा वापर करून अली असगर शिराझी हा ऑस्ट्रेलिया आणि युनायटेड किंग्डममध्ये ड्रग्ज पाठवत होता. त्यामुळे या दोन देशांत ८ कोटी रुपये किमतींच्या केटामाइन आणि व्हायग्राची तस्करी केल्याप्रकरणी त्याला अटक देखील करण्यात आली होती. मे महिन्यात ही कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी वाँटेड म्हणून घोषित केलेला शिराझी हा दुबईला पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. त्याचवेळी मुंबई विमानतळावरून त्याला अटक करण्यात आली होती. आत्तापर्यंत ईडीने ड्रग पेडलर अली असगर शिराझी याच्याशी संबंधित असलेल्या ७ ठिकाणांवर छापेमारी केली आहे, तर अजूनही अन्य काही ठिकाणी छापेमारी करण्याचे ईडीचे काम सुरू आहे. मे महिन्यात अली शिराझीचा अटक करण्यापूर्वी अँटी एक्स्टॉर्शन सेलने मार्चमध्ये शोध सुरू केला होता. पोलिसांच्या पथकाने त्याच्या शोधासाठी जम्मू आणि काश्मीर, दिल्ली आणि देशातील अनेक ठिकाणी भेट दिल्या. परंतु तो सतत त्याचे ठिकाण बदलत होता. परंतु, मोठ्या शिताफीने त्याला मे महिन्यात अटक करण्यात आली. सध्या ईडीकडून अली असगर शिराझीशी संबंधित असलेल्या ठिकाणांवर छापेमारी करण्यात येत आहे. अली हा मुंबईतील अंधेरी परिसरात वास्तव्यास आहे. त्यामुळे ईडीची त्याच्या घरावर आणि कार्यालय या ठिकाणी छापेमारी सुरू आहे. या छापेमारीत ईडीला नेमके काय सापडले आहे? याबाबतची कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

आंतरराष्ट्रीय तस्कर कैलाश राजपूत याचा सहकारी

अमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय स्तरावर तस्करी करणारा म्होरक्या कैलाश राजपूत याचा शिराझी हा सहकारी असल्याचे सांगण्यात आले आहे. कैलाश राजपूत आणि त्याच्यासह आणखी तीन जणांविरोधात या आधीच लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली होती. कैलाश राजपूत याच्या टोळीतील अली असगर शिराझी हा महत्त्वाचा आणि टोळीची जबाबदारी असलेला सदस्य असून गुन्हा दाखल झाल्यानंतर अली असगर शिराझी गायब झाला होता, पण अखेर मे महिन्यात त्याला अटक करण्यात आली. एअर कार्गोमध्ये लपवून ८ कोटी रुपयांच्या केटामाइनची ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटनमध्ये तस्करी केल्याप्रकरणी गुन्हे शाखेने अली असगर शिराझी याला अटक केली होती. त्याआधी १५ मार्चला गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने शिराझी याच्या अंधेरी परिसरात छापा टाकून १५ किलो ७४० ग्रॅम केटामाइन आणि २३ हजारांहून अधिक व्हायग्राची पाकिटे जप्त केली होती. केटामाइनची किंमत सात कोटी ८७ लाख रुपये, तर व्हायग्राची किंमत ५८ लाख रुपये होती. या प्रकरणात आत्तापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in