पत्राचाळ घोटाळाप्रकरणी ईडीचे मुंबईत तीन ठिकाणी छापे

राऊत यांच्या अटकेच्या १७ दिवसांनंतर ईडीने बुधवारी मुंबईत तीन ठिकाणी छापे टाकले.
पत्राचाळ घोटाळाप्रकरणी ईडीचे मुंबईत तीन ठिकाणी छापे
Published on

पत्राचाळ जमीन घोटाळाप्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची ईडीकडून चौकशी सुरू असून ते न्यायालयीन कोठडीत आहेत. हे सर्व सुरू असतानाच राऊत यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. ईडीने पुरावे गोळा करण्यासाठी मुंबईत बुधवारी तीन ठिकाणी छापे टाकले आहेत.

राऊत यांच्या अटकेच्या १७ दिवसांनंतर ईडीने बुधवारी मुंबईत तीन ठिकाणी छापे टाकले. मुलुंड, विक्रोळी, भांडूप या भागात ईडीने छापे टाकत आणखीन काही पुरावे मिळतात का, याची चाचपणी केली. संध्याकाळपर्यंत सुरू असलेल्या या धाडसत्रात कोणती कागदपत्रे मिळाली, याची माहिती ईडीकडून गुप्त ठेवण्यात आली आहे. संजय राऊत हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. शिवाय गोरेगाव येथील पत्राचाळ जमीन घोटाळाप्रकरणी त्यांची चौकशीही सुरू आहे. मात्र, ईडीकडून आतमध्ये चौकशी आणि बाहेर शहरात धाडी असे चित्र आहे. बुधवारी श्रद्धा डेव्हलपर्सवर टाकण्यात आलेली धाड ही राऊतांशीच संबंधित असल्याचे ईडीकडून सांगण्यात आले आहे. या डेव्हलपर्सचे अनेक प्रोजेक्ट हे सुनील राऊत यांच्या मतदारसंघात आहेत. त्यामुळे राऊतांच्या अडचणी आणखी वाढणार का, अशी शंका आता उपस्थित होऊ लागली आहे. राऊतांवर कारवाई झाल्यानंतरची ही तिसरी छापेमारी आहे. संजय राऊत यांना १ ऑगस्ट रोजी रात्री अटक करण्यात आल्यानंतर सुरुवातीला विशेष न्यायालयाने राऊतांना चार दिवसांची ईडी कोठडी सुनावली होती. त्यानंतर पुन्हा चार दिवसांची वाढविण्यात आली होती. यानंतर १२ दिवसांची म्हणजेच २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या काळात संजय राऊतांच्या पत्नीलादेखील ईडीने चौकशीला बोलविले होते.

logo
marathi.freepressjournal.in