
मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजेच ईडीने (Enforcement Directorate)अर्थातच ईडीने समन्स बजावले आहे. कोवीड-१९ महामारी काळात झालेल्या मृत्यूंच्या बॉडी बॅग्ज खरेदी प्रकरणात घोटाळा झाल्याचा आरोप पेडणेकर यांच्यावर करण्यात आला आहे. याच प्रकरणात ईडीने पेडणेकर यांना समन्स बजावलं आहे. ईडीने केलेल्या दाव्यानुसार एक कंपनी जी बॉडी बॅग दुसऱ्या कंपनीला २००० रुपयांना देत होती. तिच कंपनी मुंबई महापालिकेला तीच बॉडी बॅग तब्बल ६,८०० रुपयांना देत होती. या कंपनीसोबत देण्यात आलेलं टेंडर तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकर यांच्या सहीने दिलं जात होतं. पेडणेकर या सध्या शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या आहेत.
मुंबई पोलिसांनी कोविड डेड बॉडी बॅग्ज खरेदी प्रकरणात कोशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने पालिकेचे केंद्रीय खरेदी विभागाचे माजी उपायुक्त रमाकांत बिरादार यांना मृत कोविड-१९ रुग्णांसाठी बॉडी ब२ग खरेदी करताना झालेल्या अनियमिततेच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी समन्स धाडले होते. त्यानुसार ते चौकशीला सामोरे गेले होते. EOW द्वारा शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या आणि तक्रालीन महापौर किशोरी पेडणेकर आणि बीएमसीच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर भारतीय दंड संहिता कलम ४२० (फसवणूक) आणि १२० (बी)(गुन्हेगारी कट) यांसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.
कोरोना महामारी काळात उद्भवलेल्या भयंकर परिस्थिती दरम्यान मुंबई महापालिकेकडून आरोग्य सुविधांच्या बाबतीत मोठ्या प्रमाणावर घोटाळा झाल्याचा आरोप आहे. ज्यात मृत कोरोना रुग्णांसाठी खरेदी करण्यात आलेल्या बॉडी बॅग्ज, मास्क आणि इतर वस्तूंमध्ये निधीचा गैरवापर केला गेला. त्यांच्या खरेदीही अनियमितता झाल्याचा आरोप आहे. किशोरी पेडणेकर या नोव्हेंबर २०१९ ते २०२२ या काळात मुंबईच्या महापौर पदावर कार्यरत होत्या.
किशोरी पेडणेकर यांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. या अर्जात त्यांनी हे प्रकरण खोट असून त्यात आपणास मुद्दाम गोवले असल्याचं म्हटलं आहे. उल्लेखनीय असं की, किशोरी पेडणेकर यांच्या पक्षात फूट पडल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी या प्रकणात फक्त आरोप केले जात होते. किशोरी पेडणेकर या उद्धव ठाकरे गटात राहिल्याने त्यांच्यावर दबाव निर्माण करण्यासाठी त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे.
दरम्यान, ईडीने बीएमसी कोविड -१९ केंद्र घोटाळ्यासंदर्भात मुंबईतील १५ ठिकाणी छापेमारी केली. ज्यात अधिकाऱ्यांनी ६८.६५ लाख रुपये रोख आणि कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेची कागदपत्रे जप्त केली आहेत. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार मनी लॉंडरींग विरोधात असलेल्या या एजन्सीने राज्यातील विविध ठिकाणी ५० पेक्षाही अधिक ठिकाणी स्थावर मालमत्तेची कागदपत्रे जप्त केली आहे. ज्यांचे बाजारमुल्य जवळपास १५० कोटींच्या आसपास आहे. याशिवाय मुदत ठेवी आणि १५ कोटी रुपयांची गुंतवणूक आणि २.४६ लाख रुपयांचे दागिणेही जप्त करण्यात आले आहेत. ईडीने अनेक गुन्हेगारी कागदपत्रे आणि अनेक मोबाईल फोन लॅपटॉप देखील जप्त केल्याचं समजतं.