किशोरी पेडणेकर यांना ईडीचे समन्स

प्रकरणात एकूण ४९ लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप असून, संबंधित कंपनीकडून खरेदी करण्याचे आदेश किशोरी पेडणेकर यांनी दिल्याचाही आरोप आहे.
किशोरी पेडणेकर यांना ईडीचे समन्स
Published on

मुंबई : कोविड काळामध्ये मुंबई महानगरपालिकेने खरेदी केलेल्या बॉडी बॅग्जमध्ये झालेल्या कथित घोटाळाप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी)ने मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना २५ जानेवारी रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले आहे. यापूर्वी २३ नोव्हेंबर रोजी किशोरी पेडणेकर यांची ईडीच्या अधिकाऱ्यांनी सहा तास चौकशी केली होती.

कोविड काळामध्ये खरेदी झालेल्या बॉडी बॅग्ज या एका खासगी कंपनीकडून मुंबई महानगरपालिकेने तिप्पट दराने खरेदी केल्याचा आरोप करत या प्रकरणी ४ ऑगस्ट रोजी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा नोंदवला होता. याच गुन्ह्याच्या आधारे ईडी या प्रकरणाचा तपास करत आहे. संबंधित खासगी कंपनीने मृतदेहासाठी तयार करण्यात आलेली बॉडी बॅग मुंबई महापालिकेने ६७१९ रुपये दराने (प्रति बॅग दर) खरेदी केली होती, तर हीच बॉडी बॅग त्याच कंपनीकडून राज्य सरकारच्या अन्य रुग्णालयात तसेच खासगी रुग्णालयात १५०० रुपये प्रति बॅग दराने खरेदी करण्यात आली. या प्रकरणात एकूण ४९ लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप असून, संबंधित कंपनीकडून खरेदी करण्याचे आदेश किशोरी पेडणेकर यांनी दिल्याचाही आरोप आहे.

logo
marathi.freepressjournal.in