Anil Parab : अनिल परबांविरोधात ईडीची मोठी कारवाई; साई रिसॉर्ट प्रकरणी संपत्ती केली जप्त
शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब (Anil Parab) यांच्याविरोधात दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. ईडीने त्यांची तब्बल १०.२० कोटींची संपत्ती जप्त केल्याची माहिती दिली आहे. ट्विट करत ईडीने ही माहिती दिली. यावर अनिल परब प्रतिक्रिया देताना म्हणाले, 'माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. अशी जर कारवाई माझ्यावर करण्यात आली असेल तर मी न्यायालयात दाद मागणार आहे.
ईडीने ट्विट केले की, माजी मंत्री अनिल परब यांची मनी लाँड्रिंग चौकशीच्या संदर्भात ईडीने १०.२० कोटी रुपयांची मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जप करण्यात आलेल्या मालमत्तेमध्ये रत्नागिरीतील त्यांची ४२ गुंठे जमीन, तिथे बांधण्यात आलेल्या साई रिसॉर्टचादेखील समावेश आहे. दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीकडून अनेकदा अनिल परब यांची चौकशी करण्यात आली आहे.