एडलवाइज कंपनीच्या अध्यक्षांची हायकोर्टात धाव

खंडपीठाने याचिकेवर मंगळवारी सुनावणी निश्‍चित केली होती.
एडलवाइज कंपनीच्या अध्यक्षांची हायकोर्टात धाव

मुंबई : प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येमुळे कलाविश्वासह सर्वत्र खळबळ उडाली असतानाच या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे. देसाई यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी खालापूर पोलिसांनी फायनान्स कंपन्यांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याने कठोर कारवाईपासून संरक्षण मिळवण्यासाठी एडलवाइज फायनान्स कंपनीचे अध्यक्ष रशेश शहा आणि एडलवाइज असेट रिकंस्ट्रक्शन कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) राज कुमार बन्सल यांनी हायकोर्टाचे दार ठोठावले आहे. देसाई यांच्याकडील थकित कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी आम्ही कुठलीही सक्तीची पावले उचलली नसल्याचा दावा करून कठोर कारवाई पासून संरक्षण द्यावे तसेच गुन्हा रद्द करावा, अशी विनंती फायनान्स कंपन्यांनी न्यायालयाला केली आहे.

नितीन देसाई यांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आल्यानंतर त्यांच्या पत्नी नयना यांनी ४ ऑगस्टला खालापूर पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्याआधारे पोलिसांनी रशेश शहा, बन्सल, जितेंद्र कोठारी व इतर दोघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अटकेची शक्यता निर्माण झाल्याने रशेश शहा आणि राजकुमार बन्सल यांनी स्वतंत्र याचिका हायकोर्टात दाखल केल्या आहेत.

या याचिकांवर तातडीने सुनावणी घ्यावी, अशी विनंती ज्येष्ठ वकील अ‍ॅड. अमित देसाई यांनी न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि न्यायमूर्ती राजेश लड्ढा यांच्या खंडपीठापुढे केली होती. खंडपीठाने याचिकेवर मंगळवारी सुनावणी निश्‍चित केली होती. मात्र मंगळवारी खंडपीठ उपलब्ध नसल्याने सुनावणी होऊ शकली नाही.

logo
marathi.freepressjournal.in