दहशतवाद्यांना निधी पुरवणाऱ्या संशयित बिल्डरवर ‘ईडी’ची नजर

तपास यंत्रणेने संशयिताची ओळख लपवली आहे
दहशतवाद्यांना निधी पुरवणाऱ्या संशयित बिल्डरवर ‘ईडी’ची नजर

मुंबई: अंमलबजावणी संचालनालय (ईडी) सध्या पीएमएलएअंतर्गत दहशतवादी निधी आणि देशविरोधी कारवायांचा समावेश असलेल्या प्रकरणाची चौकशी करत आहे. यात तपासात एक संशयित बिल्डर असून, तो दहशतवादी गटाशी संबंधित आणि देशविरोधी कारवायांमध्ये गुंतल्याचा संशय आहे. हा नामवंत बिल्डर असूनही, तो गुप्तपणे दहशतवादी संघटनांना महत्त्वाच्या काळासाठी निधी पुरवत असल्याचे दिसून येते.

तपास यंत्रणेच्या खात्रीलायक सूत्रांनी सांगितले की, हा बिल्डर दहशतवादी संघटनांना निधी पुरवत आहे. गेल्या काही वर्षांत त्याने ३ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम दुबई व अन्य आखाती देशांत पाठवल्याचे तपासात समोर आले आहे. या बिल्डरने भारतातील बांधकाम क्षेत्रात मोठी गुंतवणूक केली आहे. मात्र, त्याच्या पैशाचा स्रोत अनिश्चित आहे. त्याची प्राप्तिकर विवरणपत्रे व वित्तीय माहिती तपासली असता त्याने जाहीर केलेल्या उत्पन्नाचे पुरावे मर्यादित असल्याचे दिसून आले. त्याने या व्यवसायात गुंतवलेले पैसे रोख स्वरूपात घेतले आणि नंतर आर्थिक व्यवस्थेत सामावून घेतले गेले.

तपास यंत्रणेने संशयिताची ओळख लपवली

या प्रकरणाचा तपास अजून अर्ध्यावर असल्याने तपास यंत्रणेने संशयिताची ओळख लपवली आहे. ‘ईडी’ला काही संशयास्पद व्यवहार सापडले आहेत. यात हवालामार्फत व खोट्या कंपन्यांमार्फत मोठ्या प्रमाणावर निधी दुबईला पाठवल्याचे दिसत आहे. ईडीने याची चौकशी केल्यावर त्यांना एका व्यावसायिकाचे नाव आणि तो वापरत असलेल्या बनावट कंपन्यांची माहिती मिळाली. ‘ईडी’ने सखोल तपास केल्यानंतर या व्यावसायिकाने वेगवेगळ्या नावाने नोंदणी केलेल्या या गुप्त बनावट कंपन्यांचा वापर करून आखाती देशांत पैसे पाठवल्याचे आढळले. या पैशाचा वापर अवैध व्यवसायासाठी केला जात आहे. विशेष करून देशविरोधी कारवायांसाठी. हा बिल्डर दहशतवाद्यांशी संबंधित असू शकतो आणि काही घातक कृत्यांमध्ये सामील असू शकतो, असे सूत्राने सांगितले.

या संशयित पैशाचा माग काढण्याचा प्रयत्न ‘ईडी’कडून केला जात आहे. या बिल्डरला अवैध मार्गाने मिळालेल्या पैशाचा वापर संशयित बांधकाम कंपन्यांमध्ये करण्यात आला. या व्यवहारात बहुतांशी रोख रकमेचा वापर केला. या प्रकरणाचा तपास करणारे ‘ईडी’चे विशेष संचालक सत्यब्रत कुमार यांनी या प्रकरणी विचारलेल्या प्रश्नांवर मौन बाळगले.

logo
marathi.freepressjournal.in