शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांना राष्ट्रीय पुरस्कार शैक्षणिक गुणवत्ता वाढवणे, मिशन अॅडमिशन ससेक्स

पालिकेच्या शिक्षण विभागामार्फत या राष्ट्रीय पुरस्काराकरिता महाराष्ट्राचे शिक्षक आयुक्त यांच्याकडे अहवाल सादर करण्यात आला
शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांना राष्ट्रीय पुरस्कार शैक्षणिक गुणवत्ता वाढवणे, मिशन अॅडमिशन ससेक्स

मुंबई : शैक्षणिक विषयात उल्लेखनीय योगदान, मिशन अॅडमिशन अशा नावीन्यपूर्ण उपक्रमाबद्दल देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पुरस्काराकरिता बृहन्मुंबई महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांना गौरविण्यात आले. सन २०२२-२३ करिता राष्ट्रीय शैक्षणिक योजना एवं प्रशासन संस्था, नवी दिल्ली या संस्थेद्वारा कंकाळ यांना सन्मानित करण्यात आले.

नवी दिल्ली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र येथील भीम सभागृहात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते व केंद्रीय शिक्षण सचिव संजय कुमार, एनआयईपीएचे कुलपती महेशचंद्र पंत, उपकुलपती शशिकला वंजारी, कार्यक्रम संचालक कुमार सुरेश आदी मान्यवरांच्या उपस्थितीत मंगळवारी या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. इक्बाल सिंह चहल व अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विभागामार्फत ‘मिशन अॅडमिशन, एकच लक्ष्य-एक लक्ष’ अशा विशेष मोहिमा राबविण्यात आल्या. या अंतर्गत महानगरपालिकेच्या आठ माध्यमाच्या १२१४ शाळा व ११३४ बालवाड्यांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये सुमारे १ लाख १८ हजार विद्यार्थ्यांचा प्रवेश झाला आहे. नवीन प्रवेशाचे उद्दिष्ट साध्य झाल्यानंतर सहआयुक्त (शिक्षण) गंगाथरण डी. यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता वाढीसाठी ‘मिशन मेरिट’ राबविण्यात येत आहे.

पालिकेच्या शिक्षण विभागामार्फत या राष्ट्रीय पुरस्काराकरिता महाराष्ट्राचे शिक्षक आयुक्त यांच्याकडे अहवाल सादर करण्यात आला. या अहवालाचे परीक्षण करून राज्य स्तरावरून शिफारस करण्यात आली. यानंतर केंद्र शासनाच्या स्तरावर संगणकीय सादरीकरण व मुलाखत घेण्यात आली. हे सर्व टप्पे यशस्वीरित्या पार करत बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाला शिक्षण क्षेत्रातील प्रशासन देखरेख करणाऱ्या अतिउच्च यंत्रणेकडून हा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सर्वांनी संघ भावनेतून दिलेल्या योगदानामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाचा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान झाला, अशी भावना शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांनी व्यक्त केली.

logo
marathi.freepressjournal.in