नोकरी अन् भाकरीच्या पलीकडे पाहण्याची दृष्टी शिक्षणाने द्यायला हवी! मोटिव्हेशनल स्पीकर किरण देशमुख यांचे प्रतिपादन

स्पष्टता नसल्यामुळे उच्च शिक्षणाच्या क्षेत्रातील निराशा वाढत चालली आहे
नोकरी अन् भाकरीच्या पलीकडे पाहण्याची दृष्टी शिक्षणाने द्यायला हवी! मोटिव्हेशनल स्पीकर किरण देशमुख यांचे प्रतिपादन

नांदेड : 'उपजीविकेसाठीच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करुन द्याव्यात, अशा अपेक्षा उच्च शिक्षणाकडून बाळगल्या जातात; सध्याच्या परिस्थितीत त्या अनाठायी नाहीत, असे मानले तरी केवळ उपजीविकेच्या विचारात अडकून पडण्यात तेजस्वी तारुण्याची शोकांतिका आहे; म्हणून उपजीविकेपेक्षा जीविकेचा शोध घ्यायला प्रवृत्त करून नोकरी आणि भाकरीच्या पलीकडे पाहण्याची दृष्टी शिक्षणाने प्रदान करायला हवी' असे प्रतिपादन मोटिव्हेशनल स्पीकर आणि अभ्यासू वक्ते किरण देशमुख यांनी केले.

यशवंत महाविद्यालयातील कै. डॉ. शंकरराव चव्हाण लेक्चर सीरीज आणि व्यक्तिमत्त्व विकास समितीच्या वतीने आयोजित विशेष व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेशचंद्र शिंदे हे होते.

'शिक्षण, नोकरी आणि आयुष्याची भाकरी' या विषयावर बोलताना देशमुख पुढे म्हणाले की, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण घेताना एकवेळ ते आपण का घेत आहोत, याबद्दल माहिती नसेल, तर फार फरक पडत नाही; पण उच्च शिक्षण घेतांना ते घेण्यामागील हेतूंमध्ये स्पष्टता असायला हवी. अशी स्पष्टता नसल्यामुळे उच्च शिक्षणाच्या क्षेत्रातील निराशा वाढत चालली आहे. ती कमी करायची असेल तर व्यवसाय आणि नोकरीपेक्षा आयुष्याची भाकरी कशी संपादित करायची, याचे शिक्षण अधिक मिळायला हवे. यासाठी करिअर आणि कला यांच्यातील अनुबंध पुनर्स्थापित करायला हवेत', अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

याप्रसंगी प्रीती भुताळे या विद्यार्थीनीने 'शांतता! कोर्ट चालू आहे' या स्वगताचा तर कृष्णा आनंदा वाघमारे या विद्यार्थ्याने 'वऱ्हाड निघालंय लंडनला' या एकपात्री नाटकाच्या बहारदार प्रयोगाचे सादरीकरण केले. लेक्चर सीरीजचे समन्वयक डॉ. विश्वाधार देशमुख यांनी प्रास्ताविकात व्याख्यानमालेच्या आयोजनामागील भूमिका विशद केली. पाहुण्यांचा परिचय अंजली मद्रेवार यांनी करून दिला, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजली गायकवाड या विद्यार्थीनीने केले.

logo
marathi.freepressjournal.in