मुंबई : मुंबईत आगामी विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी निवडणूक यंत्रणा प्रयत्नशील असून त्यासाठी रहिवासी संकुले, गृहनिर्माण संस्थांशी चर्चा करावी, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी शुक्रवारी आढावा बैठकीत दिले.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यांमध्ये विविध यंत्रणांनी केलेल्या पूर्वतयारींचा गगराणी यांनी पालिका मुख्यालयात आयोजित बैठकीत आढावा घेतला. मतदानाची टक्केवारी वाढवणे अत्यंत महत्त्वाचे असल्याने प्रत्येक नागरिकापर्यंत आपली यंत्रणा पोहोचेल, हे सुनिश्चित करावे. मतदार यादीमध्ये मतदारांची नाव नोंदणी करणे इत्यादी प्रक्रियाही लवकरात लवकर पूर्ण करावी, असे गगराणी यांनी बैठकीत सांगितले.
नागरिकांना त्यांच्या निवासाच्या ठिकाणापासून अगदी जवळ मतदान केंद्र उपलब्ध करून देण्यासाठी सुलभ रचनेवर भर देण्यात आला आहे. त्याअनुषंगाने देखील गृहनिर्माण संस्थांशी पुन्हा एकदा भेटी देऊन समन्वय साधावा, यात कोणतीही अडचण असल्यास वेळीच तोडगा काढावा. निवडणुकीसंदर्भातील संपूर्ण तयारी अत्यंत चोखपणे आणि जबाबदारीने पार पाडावी, असे निर्देश गगराणी यांनी यावेळी दिले.
या बैठकीला अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी (मुंबई शहर) संजय यादव उपस्थित होते.
तयारीचे सादरीकरण
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील विविध मतदारसंघांमधील मतदान केंद्रांची स्थिती, आवश्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती, मतदार याद्यांची स्थिती आणि नागरिकांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करणे, मतदान संयंत्र ठेवण्यासाठी स्ट्राँग रूम, संवेदनशील मतदान केंद्रांची यादी, पोलीस आणि निवडणूक यंत्रणा यांच्याकडून विविध मतदारसंघांमध्ये संयुक्त पाहणी आदींबाबत अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी क्षीरसागर आणि विशेष कार्य अधिकारी (निवडणूक) विजय बालमवार यांनी सादरीकरण केले.