निवडणूक पुढे ढकलण्यासाठी शर्थीचे प्रयत्न; शिक्षक भारती संघटनेची दिल्लीत धाव : केंद्रीय निवडणूक आयोगाला निवेदन

मुंबई शिक्षक मतदारसंघाची निवडणूक पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी शिक्षक भारती संघटनेने केली आहे.
निवडणूक पुढे ढकलण्यासाठी शर्थीचे प्रयत्न; शिक्षक भारती संघटनेची दिल्लीत धाव : केंद्रीय निवडणूक आयोगाला निवेदन
Published on

मुंबई : मुंबई शिक्षक मतदारसंघाची निवडणूक पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी शिक्षक भारती संघटनेने केली आहे. या मागणीसाठी आमदार कपिल पाटील आणि शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष किसन मोरे यांनी दिल्लीत धाव घेतली आहे. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात निवडणुका घेण्याची विनंती संघटनेने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने मुंबई शिक्षक मतदार संघासह राज्यातील शिक्षक, पदवीधर मतदार संघांच्या निवणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार या मतदारसंघांमध्ये १० जून २०२४ रोजी मतदान होणार आहे. मात्र शाळा १५ जूननंतर सुरू होणार असल्यामुळे सुट्ट्यांवर गेलेल्या शिक्षक मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. सुट्ट्यांमुळे मतदार मतदानापासून वंचित राहण्याची भीती संघटनेने व्यक्त केली आहे.

मतदानाच्या तारखेबद्दल गोंधळ होऊ शकतो, हे गृहित धरून कपिल पाटील यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांना याबाबत फेब्रुवारीत निवेदन दिले होते. मतदानाची तारीख शाळा सुरू झाल्यानंतर घेण्याची विनंती त्यांनी केली होती. ही परिस्थिती केंद्रीय निवडणूक आयोगाला कळविण्यात आली आहे. निवडणूका पुढे ढकलायच्या किंवा नाही याबाबतचा निर्णय आयोग घेईल अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम यांनी दिली.

मागील २०१८ च्या निवडणुकीतही अशीच अनिश्चितता होती. मतदानाची तारीख ८ जून २०१८ ही जाहीर केली गेली होती, परंतु आमदार कपिल पाटील यांनी तथ्यांसह भारत निर्वाचन आयोगाकडे मागणी केल्यानंतर, तारीख बदलून २५ जून २०१८ करण्यात आली. विधान परिषदेच्या वरील चारही सदस्यांचा कार्यकाळ ७ जुलै २०२४ रोजी संपत आहे. शिवाय, १० जूनला निवडणूक घेणे हे निर्वाचन आयोगाच्या ‘नो व्होटर टू बी लेफ्ट बिहाइंड’ या तत्त्वाशी विसंगत ठरेल, असे कपिल पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे.

निवडणूक १० जूनला, पण मतदार गावाला

मुख्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर, नाशिक शिक्षक आणि मुंबई शिक्षक या चार मतदारसंघांसाठी १० जून २०२४ रोजी मतदान होणार आहे. मात्र सध्या महाराष्ट्रात उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आहेत. शिक्षक त्यांच्या मूळ गावी गेले आहेत. १५ जून आणि १८ जून रोजी शाळा पुन्हा सुरू होत आहेत. त्यामुळे शिक्षक आणि पदवीधर १० जून २०२४ रोजी मतदान करण्यासाठी त्यापूर्वी परत येतील, अशी अपेक्षा करणे केवळ अशक्य आहे. मुंबईतील शिक्षक/पदवीधर मतदारसंघात उत्तर भारतीय मतदारही मोठ्या संख्येने आहेत. ते टीचर्स स्पेशल ट्रेनने परततील, जी १० जून २०२४ रोजी गोरखपूरहून निघेल आणि ११ जून २०२४ रोजी मुंबईत पोहोचेल.

logo
marathi.freepressjournal.in