मुंबई: अंड्यांचा पुरवठा १० ते १५ टक्के घटल्याने त्याच्या दरात वाढ झाली आहे. अंडी आता ९० रुपये डझन झाली आहेत.
मुंबईच्या अंडी संघटनेचे अध्यक्ष राजू शेवाळे यांनी सांगितले की, यंदाच्या उन्हाळ्यात अंड्यांच्या उत्पादनात २५ ते ३५ टक्के घट झाली होती. दरवर्षी उन्हाळ्यात अंड्यांच्या उत्पादनात घट होत असते. मात्र, यंदा नेहमीपेक्षा अंड्यांच्या उत्पादनात घट झाली. पाऊस पडल्यावर अंड्यांचे दर कमी होतात. कारण उत्पादन पुन्हा सुरळीत होते.
सानपाड्याच्या मॅक्को मार्केटमधील व्यापाऱ्याने सांगितले की, येत्या १५ दिवसांत अंड्यांचे उत्पादन सुरळीत होईल. यंदा भाज्यांचा पुरवठा कमी झाल्याने अंड्यांची मागणी वाढली आहे.
हिवाळा व पावसाळ्यात मागणी वाढत असल्याने अंड्यांच्या दरात नेहमीच वाढ होते. सध्या रोज अंड्यांच्या दरात चढ-उतार होत आहेत. सध्या मागणी वाढून पुरवठा कमी झाल्याने अंड्याचा दर डझनाला ९० रुपये झाला आहे, असे एका व्यापाऱ्याने सांगितले.
अंड्यांचे दर हे दर्जा व ब्रँडवर अवलंबून असतात. सहा अंड्यांच्या पॅकेजच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सध्या सहा अंड्यांच्या पॅकला ६५ ते ११० रुपये दर आहे.
रोज ९० लाख अंड्यांची मागणी
मुंबई महानगर प्रदेशात रोज ९० लाख अंडी लागतात. श्रावण सुरू झाल्यानंतर अंड्यांच्या दरात आणखी घसरण होऊ शकते. यंदा अधिक श्रावण असल्याने अंड्यांच्या दरात वाढ होणार नाही, असे शेवाळे म्हणाले.
मुंबई महानगर क्षेत्राला मिरज, गुजरात व हैदराबाद येथून अंड्यांचा पुरवठा होत असतो.
तसेच व्यापाऱ्यांनी सांगितले की, कच्च्या मालाच्या भावात मोठी वाढ झाली आहे. कोंबड्याला लागणाऱ्या खाद्यपदार्थांचे दर वाढले आहेत. अनेक पदार्थ हे अन्य राज्यातून येतात. त्यामुळे वाहतूक खर्च वाढतो. त्यातून कुक्कुटपालन उत्पादनाचा खर्च वाढतो