
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी मोक्का कायद्यांतर्गत गुन्हा दाखल होताच मंगळवारी शूटरसह आठ आरोपींना गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी मोक्का कायद्यांतर्गत अटक केली. अटकेनंतर या आठ जणांना पोलीस बंदोबस्तात मोक्का न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्यांना शनिवार ७ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या वृत्ताला पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी दुजोरा दिला आहे.
१२ ऑक्टोबरला दसऱ्याच्या दिवशीच बाबा सिद्दीकी यांची वांद्रे येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येनंतर पळून जाणाऱ्या तीनपैकी गुरमेल बलजीत सिंग आणि धर्मराज राधे कश्यप या दोन्ही शूटरना पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्याकडून पोलिसांनी दोन पिस्तूल, एक मॅगझीन, २८ जिवंत काडतुसे जप्त केले होते. या गुन्ह्याचा तपास नंतर खंडणीविरोधी पथकाकडे सोपविण्यात आला होता. या दोघांच्या अटकेनंतर त्यांच्या चौकशीतून आलेल्या माहितीवरून पोलिसांनी इतर २४ आरोपींना विविध परिसरातून अटक केली होती. याच गुन्ह्यात ते सर्वजण सध्या न्यायालयीन कोठडीत होते. या घटनेनंतर राज्यभर खळबळ माजली होती. तसेच आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणीही केली होती.
पोलिसांकडून नव्याने चौकशी सुरू
शनिवारी या सर्व आरोपींविरुद्ध मोक्का कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच शूटरसह आठ जणांना मंगळवारी पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यात ते सर्वजण सध्या पोलीस कोठडीत आहेत. या सर्वांची पोलिसांकडून नव्याने चौकशी सुरू आहे.