
मुंबई : मुंबईतील वाढत्या प्रदूषणाला रोखण्यासाठी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. धूळ नियंत्रणासाठी पाच ठिकाणी धूळ नियंत्रण यंत्र बसवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला. एप्रिल महिन्यात कंत्राटदाराला कार्यादेश देण्यात आले असून आठ महिने उलटले, तरी धूळ नियंत्रीत यंत्रणा कागदावरच आहे. त्यामुळे प्रदूषणाबाबत मुंबई महापालिका गंभीर आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
काही वर्षांपासून मुंबईतील हवा दुषित होत चालली आहे आणि त्याचे दुष्परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असल्याने वाहतूक कोंडी होणाऱ्या पाच ठिकाणी खुल्या हवेतील धूळ शमन केंद्र आणि धूळ नियंत्रण प्रणाली बसवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. एप्रिल महिन्यात कंत्राटदाराला कार्यादेश दिल्यानंतर आठ महिन्यांत ही यंत्रणा बसवणे आवश्यक असतानाही अद्यापही ही यंत्रणा बसवली गेलेली नसून, महापालिका प्रशासन वाढत्या प्रदुषणाबाबत किती गंभीर आहे हे यामाध्यमातून समोर आले. महापालिकेच्या विभागीय कार्यालयातील देखभाल विभाग व पर्यावरण विभाग यांच्या समन्वयातील अभावामुळे ही यंत्रणा बसवण्यात विलंब होत असल्याची माहिती समोर आली आहे.
जागा निश्चित होऊनही यंत्रणा बसवली नाही
मुंबईतील एलबीएस जंक्शन, छेडा नगर, बीकेसी कलानगर जंक्शन, दहिसर चेकनाका आणि हाजीअली येथील पाच ठिकाणी ही यंत्रणा बसवली जाणार होती, परंतु हाजीअली येथे महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या वतीने यंत्रणा बसवलेली असल्याने ही जागा बदलून जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवरील ट्रॉमा केअर रुग्णालय येथील चौकात ही यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जागा निश्चित होऊनही ही यंत्रणा अदयापही बसवण्यात आलेली नाही.