मुंबई : घाटकोपर छेडा नगर येथील बेकायदा होर्डिंग्ज लावणाऱ्या दोषी इगो मीडियाचे दादरच्या टिळक पुलावर आठ बेकायदा होर्डिंग्ज असल्याचे निदर्शनास आले आहे. हे होर्डिंग्ज तीन दिवसांत काढा, अशी नोटीस मुंबई आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाने रेल्वेला बजावली आहे. पालिकेने होर्डिंग्ज हटवण्याची कारवाई केल्यास कारवाईचा सगळा खर्च रेल्वेकडून वसूल करण्यात येणार असल्याचे पालिकेच्या नोटिशीत नमूद केले आहे.
इगो मीडियाचे मुंबईत अनेक ठिकाणी बेकायदा होर्डिंग्ज लावले आहेत. घाटकोपर छेडा नगर येथील बेकायदा होर्डिंग्ज दुर्घटनेनंतर इगो मीडियाचे बेकायदा होर्डिंग्ज असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यात दादर येथील टिळक पुलावर आठ बेकायदा होर्डिंग्ज असल्याचे निदर्शनास आले आहे. आठ होर्डिंगपैकी एका फलकाची लांबी ८० आणि रुंदी १०० फूट आहे. इतर होर्डिंग ३० बाय ४० फुटाचे आहेत. तर महाकाय १२० बाय १२० आकाराचे होर्डिंग वांद्रे रेल्वे स्थानकाच्या पूर्व परिसरात आहे. या सर्व होर्डिंग्जना पालिकेने नोटिसा बजावल्या आहेत.
घाटकोपर येथील बेकायदा होर्डिंग दुर्घटनेनंतर मुंबईतील बेकायदा होर्डिंग्ज झाडाझडती घेण्यात येत आहेत. मुंबईत रेल्वेने आपल्या हद्दीतील एकाही जाहिरात होर्डिंगसाठी पालिकेची परवानगी घेतलेली नाही. तसेच या जाहिरातीसाठी जाहिरात शुल्कही पालिका प्रशासनाकडे भरलेले नाही. मुंबईत जास्तीत जास्त ४० फूट बाय ४० फूट आकाराच्या होर्डिंगना पालिका प्रशासन परवानगी देत असते. मात्र रेल्वेच्या हद्दीतील होर्डिंग त्यापेक्षा मोठे आहेत, असे या नोटिशीत स्पष्ट केले आहे.
रेल्वे प्रशासनाने नियमबाह्य आकाराचे म्हणजे ४० फूट बाय ४० फूट पेक्षा अधिक आकाराचे सर्व होर्डिंग्ज तातडीने हटवा, अशा नोटिसा पालिका प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अंतर्गत कलम ३० (२) (व्ही) अन्वये मध्य आणि पश्चिम रेल्वेला बजावल्या आहेत.