तीन वेगवेगळ्या घरफोडीत अठरा लाखांची लूट; मुलुंड-गोरेगाव-वांद्रे येथील तिन्ही घटनेने खळबळ

परिसरातील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले असून या फुटेजवरुन पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
तीन वेगवेगळ्या घरफोडीत अठरा लाखांची लूट;
मुलुंड-गोरेगाव-वांद्रे येथील तिन्ही घटनेने खळबळ

मुंबई - तीन वेगवेगळ्या घरफोडीच्या गुन्ह्यांत सुमारे अठरा लाखांचा ऐवज चोरट्यांनी पळविला. मुलुंड, गोरेगाव व वांद्रे परिसरात उघडकीस आलेल्या या घरफोडीने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी तीन स्वतंत्र घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद करुन पळून गेलेल्या आरोपींचा सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने शोध सुरु केला आहे. अजीत नानालाल वोरा हे व्यावसायिक घाटकोपर परिसरात राहतात. त्यांचे मुलुंड येथे इलेक्ट्रॉनिक, कॉसमेटिकचे गोदाम आहे. १६ डिसेंबरला रात्री साडेदहा ते १७ डिसेंबरला सकाळी नऊच्या दरम्यान त्यांचया गोदामात अज्ञात चोरट्यांनी प्रवेश केला. त्यानंतर आतील कुलूप तोडून आठ लाख अकरा हजार पाचशे रुपयांची कॅश चोरी करुन पलायन केले. दुसर्‍या घटनेत आदिती सरवर आहुजा या महिलेच्या गोरेगाव येथील रॉयल पाम कॉलनीच्या हाऊस क्रमांक दोनमध्ये चोरट्यांनी प्रवेश करुन सहा लाख साठ हजाराचा मुद्देमाल चोरी केला. त्यात अडीच लाखांची कॅश, हिरेजडीत सोन्याच्या दागिन्यांचा समाववेश आहे. १२ डिसेंबरला पुण्याला गेलेले आदिती ही तिच्या पतीसोबत घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. तिसर्‍या घटनेत मजिबुर रेहमानअली रेहमान या कॉन्ट्रक्टरच्या वांद्रे येथील शास्त्रीनगरातील फ्लॅटमध्ये घरफोडी झाली. १७ डिसेंबर ते १८ डिसेंबर या कालावधीत त्यांच्या फ्लॅटमध्ये प्रवेश करुन चोरट्यांनी दोन लाखांची कॅश, दागिने असा तीन लाख दहा हजाराचा मुद्देमाल चोरी केला होता. त्यांची पत्नी घरी आल्यानंतर घरफोडीचा हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर तिने वांद्रे पोलिसांना ही माहिती सांगितली. याप्रकरणी मुलुंड, आरे व वांद्रे पोलिसांनी तीन घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद केली आहे. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले असून या फुटेजवरुन पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in