‘एक है, तो सेफ है’ हे वोट जिहादला प्रत्युत्तर; देवेंद्र फडणवीस यांनी केले योगी, मोदींच्या घोषणांचे समर्थन

Maharashtra assembly elections 2024 : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ या घोषणेवरून महायुतीतील नेत्यांमध्येच दुमत असले तरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र योगींच्या या घोषणेबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘एक है, तो सेफ है’ या घोषणेची पाठराखण केली.
देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीससंग्रहित छायाचित्र
Published on

प्राजक्ता पोळ/मुंबई

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ या घोषणेवरून महायुतीतील नेत्यांमध्येच दुमत असले तरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र योगींच्या या घोषणेबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘एक है, तो सेफ है’ या घोषणेची पाठराखण केली.

लोकसभेला काँग्रेसने वोट जिहाद केला, त्याला ‘एक है, तो सेफ है’ हेच प्रत्युत्तर असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी विविध विषयांवर दैनिक ‘नवशक्ति’ आणि ‘फ्री प्रेस जर्नल’शी संवाद साधला.

२०१९ साली अदानींच्या घरी सरकार स्थापनेबाबत बैठक झाली होती का?

होय, ही बैठक झाली होती. पण ती अदानींच्या घरी झाली नव्हती. त्या बैठकीत अमित शहा, शरद पवार, प्रफुल्ल पटेल, अजित पवार आणि मी होतो. त्या बैठकीत ठरले की, आता शिवसेना सोबत येत नाही. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी सरकार बनवेल. त्यात सरकारची मुदत संपत आली होती. त्यामुळे शरद पवारांनी असे सांगितले की, तुम्ही राष्ट्रपती राजवट लावा. मी महाराष्ट्र दौरा करतो. त्यानंतर महाराष्ट्रात स्थिर सरकारची गरज असल्याचे सांगून तुम्हाला पाठिंबा देऊ. ११ नोहेंबरला मला शरद पवारांचा फोन आला होता. मी अजित पवारांना पाठवतो. तुम्ही पालक मंत्री ठरवून टाका. मंत्री पण ठरले होते. पण नंतर ते मागे फिरले. ही बैठक दिल्लीत झाली होती. अदानींच्या घरी झाली नव्हती, हे निश्चित आहे.

‘बटेंगे ते कटेंगे’ हा नारा तुम्हाला या निवडणुकीत का महत्त्वाचा वाटतो? अजित पवारांनी हा नारा नाकारला आहे.

बहुतेक अजित पवारांना त्याचा अर्थ लक्षात नाही आला. जेव्हा भारतीय समाज भाषेच्या, प्रांताच्या, जाती आधारावर विभागला गेला, तेव्हा परकीय लोकांनी राज्य केले. त्यावेळी देशही कटला आणि समाजही कटला आणि व्यक्तीही कटला. पंतप्रधानांनी नुकतेच सांगितले की, ओबीसींच्या ३५० जाती एकत्र आहेत म्हणून त्याला महत्त्व आहे. जर या वेगळ्या झाल्या तर त्यांचे महत्त्व कमी होईल. ५४ जाती मिळून एसटी बनतो. पण जर त्या वेगवेगळ्या झाल्या, तर त्यांचे महत्त्व कमी होईल. आता काँग्रेसचा प्रयत्न तोच आहे. त्यासाठी मोदीजींनी सांगितले, ‘एक है, तो सेफ है.’

‘बटेंगे तो कटेंगे’ हे ओबीसी, एसटी इतक्यांपुरतेच मर्यादित आहे का?

काँग्रेस पक्षाने वोट जिहादचा प्रयोग लोकसभेत केला. त्याचा फायदा महाविकास आघाडीला मिळाला. मशिदीवर बॅनर लावून हे केले नाही, तर ‘अल्ला का धोका है’ म्हणणे हे सेक्युलर आहे का? हा वोट जिहाद आहे. त्याच्यापाठोपाठ आता ऑल इंडिया उलेमा बोर्डाने महाविकास आघाडीला १७ मागण्या दिल्या, २०१२-२०२४ या काळात जे दंगे झाले, त्यातील मुस्लिमांवरचे गुन्हे मागे घ्या या मागणीला ते हो म्हणाले. अशाप्रकारे जर एखादा समाज दबाव निर्माण करत असेल तर तुमचे अस्तित्व राहणार नाही. या कृत्यांना हे उत्तर आहे. ‘एक राहणार, तर सेफ राहणार’ हे वोट जिहादला दिलेले प्रत्युत्तर आहे. आम्ही मुस्लिम समाजाच्या विरोधात नाही. पण विशिष्ट समाजाला टार्गेट करून जर त्यांच्या मतांवर तुम्ही जर निवडणूक जिंकायला बघताय तर ते आम्ही होऊ देणार नाही. आम्ही त्याला उत्तर देणार. ‘कटेंगे तो बटेंगे’ हा काऊंटर नरेटिव्ह आहे.

महाराष्ट्रावर कर्जाचा डोंगर वाढतोय. या निवडणुकीनंतर ‘लाडकी बहीण’सारख्या योजनांचे पैसे डबल करू पाहताय, हे शक्य आहे?

आपली अर्थव्यवस्था ही ४० लाख कोटींची आहे. ४० लाख कोटींच्या अर्थव्यवस्थेत ६ ते ६.५ लाख कोटींचे कर्ज काहीच नाही. आपल्या इतकेच कर्ज उत्तर प्रदेशचे आहे. त्यांची अर्थव्यवस्था २५ लाख कोटींची आहे. ‘स्टेट जीडीपी’मध्ये देशात महाराष्ट्र नंबर वनला आहे. जेव्हा लाडकी बहीण योजनेला १५०० रुपये द्यायचे होते, तेव्हा तशी बजेटमध्ये तरतूद केली. त्याचप्रमाणे आम्ही २१०० रुपये नवीन सरकार आल्यावर देणार आहोत.

तुम्ही मित्रपक्षांना बरेच तुमचेच उमेदवार दिले?

फक्त मित्रपक्षांना नाही तर आम्ही सर्व पक्षांना उमेदवार दिले. शिवसेना (उबाठा) च्या पहिल्या यादीत आमचे १७ उमेदवार होते. आमच्या मित्रपक्षांना आम्ही ठरवून उमेदवार दिले. पण मागच्या अडीच वर्षांत आम्ही २८८ जागांवर तयारी केली. आंदोलन केले, बुथ रचना केली. त्यानंतर सांगितले, तुम्हाला उमेदवारी नाही देऊ शकत. मग कोण थांबणार? जे आमचे कोअर आहेत ते थांबले.

लाल संविधानाचा मुद्दा काँग्रेसवर उलटला का?

१०० टक्के त्यांच्यावर उलटला. लॅटिन अमेरिकेतील एका देशात अशाप्रकारे संविधान घेऊन निवडणूका लढल्या होत्या. तिथून चोरलेली ही नीती आहे. हे त्यांचे स्वत:चे नाही. लाल संविधानाच्या आत कोरी पाने आहेत, याची पोलखोल नागपूरमध्ये झाली. यापेक्षा जास्त संविधानाचा अपमान काय असू शकतो? तुम्ही एक संविधानाचे पुस्तक नाही आणू शकत? यांचा चेहऱ्यावर केवळ संविधानाचा बुरखा घातलेला आहे, आतमध्ये सगळे कोरे आहे.

माहीममधून अमित ठाकरे लढताहेत. तिथे मोदींनी सभा घेतली. तुम्ही तेथे कोणासोबत आहात?

आमची अमित ठाकरेंना मदत करण्याची इच्छा होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचीही इच्छा होती, पण जर तिथे आम्ही उमेदवार दिला नसता तर ती सर्व मते शिवसेनेकडे (उबाठा) गेली असती. त्यामुळे एक जागा कमी होईल, असे चित्र होते. त्यामुळे मुख्यमंत्री काही निर्णय करू शकले नाहीत.

या निवडणुकीच्या निकालानंतर अजित पवार हे किंगमेकर ठरतील. काही गणिते बदलू शकतील, असे नवाब मलिक म्हणाले आहेत. काय गणितं बदलतील असे वाटते?

जे हे बोलत आहेत त्यांना आम्ही महायुतीचा घटक मानत नाही.

तुमचे या निवडणुकीनंतर केंद्रात प्रमोशन होणार का?

जिना यहाँ मरना यहाँ, बीजेपी के अलावा जाना कहाँ. भाजप जे सांगणार तेच मी करणार.

निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदाबाबत काय ठरलंय?

अजून काहीही ठरलं नाही. कोणाच्या किती जागा येतील, कोणाचा स्ट्राइकरेट किती असेल, हे बघितले जाणार नाही. आम्ही तिघे बसून ठरवू. तीनही पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिल्लीतील नेत्यांशी चर्चा करतील आणि निर्णय घेतील.

एका सभेत तुम्हाला मुख्यमंत्री करण्याचे संकेत अमित शहांनी दिले आहेत?

मी इथे लिड करतोय. भाजपला जिंकवा, आपण जिंकले पाहिजे, देवेंद्र जिंकला पाहिजे, असा त्या बोलण्याचा अर्थ होता. त्यामुळे मला मुख्यमंत्री करा, असा अर्थ काढणे योग्य नाही.

या निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तुमच्या बाजूने आहे की नाही?

संघ निवडणुकीत कधी भाग घेत नाही. पण संघ विचारांच्या सर्व संघटना आमच्यासोबत आहेत.

मराठा मतदार तुमच्यासोबत आहेत का?

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला ४३.९ टक्के मते मिळाली आणि महायुतीला ४३.६ टक्के मते मिळाली. मराठा मतदारांच्या मतांशिवाय आम्हाला इतकी मते मिळू शकतात का? त्यामुळे आम्हाला मागच्या वेळेपेक्षा कमी मते मिळाणार नाहीत.

जातनिहाय जनगणेची मागणी राहुल गांधींनी केली आहे. तुमचे याबाबत काय म्हणणे आहे?

आमचा जातनिहाय जनगणनेला विरोध नाही. फक्त त्याला निवडणुकीतील शस्त्र म्हणून वापरू नये.

सिंचन घोटाळ्याची फाइल तुम्ही मुख्यमंत्री असताना अजित पवारांना दाखवली, असे अजित पवारांनीच सांगितले. त्यानंतर तुमच्यावर गोपनीयतेच्या भंगाचे आरोप झाले. काय घडले होते नेमकं?

सुप्रिया सुळे या कधी सरकारमध्ये राहिल्या नाहीत. त्यामुळे त्यांना गोपनीयता वगैरे काही कळत नाही. ही फाइल माहितीच्या अधिकारात कोणालाही मिळू शकते. अजित पवार मला म्हणत होते, तुम्ही मला टार्गेट केले वगैरे तेव्हा मी त्यांना म्हटले की तुमची चौकशी पृथ्वीराज चव्हाण सरकारने लावली आहे. तेव्हा त्यांना आश्चर्य वाटले.

logo
marathi.freepressjournal.in