मुख्यमंत्री शिंदे-देवेंद्र फडणवीसांमध्ये चर्चा; ठाणे-कल्याणबाबत एकमत झाल्याची शक्यता

जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली असून, लवकरच याची घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी दिली होती. त्यानंतरही या बैठकीचे आयोजन करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात मात्र नवी चर्चा सुरू झाली आहे.
मुख्यमंत्री शिंदे-देवेंद्र फडणवीसांमध्ये चर्चा; ठाणे-कल्याणबाबत एकमत झाल्याची शक्यता
ANI

प्रतिनिधी/मुंबई

महायुतीत अदयापही चर्चांचा सिलसिला सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात शनिवारी मध्यरात्री तब्बल तीन तास चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी झालेल्या चर्चेत कल्याण आणि ठाणे तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग या मतदारसंघांबाबत चर्चा झाल्याचे समजते. कल्याण आणि ठाणे मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेलाच सोडण्यावर या चर्चेत एकमत झाल्याचे समजते. लवकरच मतदारसंघांबाबत घोषणा होणार आहे.

महायुतीमध्ये अद्याप काही जागांवर एकमत झालेले नसल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी बैठकांचे सत्र शनिवारी दुसऱ्या दिवशीही कायम असल्याचे दिसून आले. शुक्रवारी रात्री बैठक पार पडल्यानंतर शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात वर्षा बंगल्यांवर बैठक पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी शनिवारी मध्यरात्री पार पडलेली ही बैठक जवळपास साडेतीन तास चालली. रात्री १२च्या दरम्यान उपमुख्यमंत्री फडणवीस वर्षा येथे आले, ते मध्यरात्रीनंतर तीन वाजेपर्यंत तिथेच होते. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे हेदेखील रात्री उशिराने उपस्थित झाले होते. त्यामुळे या बैठकीत कल्याण मतदारसंघाबाबत चर्चा झाल्याचा अंदाज राजकीय वर्तळात वर्तविण्यात येत आहे. तसेच या बैठकीला राज्याचे उद्योग मंत्री उदय सांमत हे सुद्धा रात्री उशिराने दाखल झाले होते. त्याबरोबरच शिवसेना नेते संजय शिरसाठ हेसुद्धा या बैठकीला हजर होते.

जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात

या बैठकीत राज्यातील काही जागांच्या अदलाबदल करण्याबाबत प्रामुख्याने चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. यात प्रामुख्याने मुंबईतील दोन मतदारसंघांसह ठाणे, कल्याण आणि इतर मतदारसंघांबाबत चर्चा झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. या बैठकीबाबत कोणतीही अधिकृत माहिती दोन्ही पक्षांकडून देण्यात आलेली नाही. तत्पूर्वी जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली असून, लवकरच याची घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी दिली होती. त्यानंतरही या बैठकीचे आयोजन करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात मात्र नवी चर्चा सुरू झाली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in