
मुंबई : महायुतीत धुसफूस सुरु असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी सायंकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या दादर येथील शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतल्याने राजकीय समीकरणे बदलणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. भाजपकडून वारंवार डावलण्यात येत असल्याने मुंबई महापालिका निवडणुकीत शिंदे सेना आणि मनसे एकत्र नांदणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
आगामी स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत मुंबई महापालिकेवर सगळ्यांचं राजकीय पक्षांनी लक्ष केंद्रीत केले आहे. त्यात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.
शिंदेंचे एक पाऊल पुढे
महायुती बरोबर येण्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना याआधीच साद घातली होती. मात्र आता एकनाथ शिंदे यांनी एक पाऊल पुढे टाकले आहे. महायुती म्हणून मनसेने बरोबर आल्यास बळ मिळेल, असे समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट म्हणाले.