एकनाथ शिंदे मुंबईत १०० जागांवर ठाम; स्वतंत्र लढण्याचीही रणनीती; भाजपच्या ६० जागांच्या प्रस्तावास नकार

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिंदे सेनेला ६० जागा देण्याचा प्रस्ताव भाजपने दिला आहे. मात्र, शिंदे सेनेने भाजपच्या या प्रस्तावाला नकार दिला असून मुंबईत १०० जागा लढण्यावर ठाम असल्याचे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील वरिष्ठ नेत्यांनी सांगितले.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिंदे सेनेला ६० जागा देण्याचा प्रस्ताव भाजपने दिला आहे. मात्र, शिंदे सेनेने भाजपच्या या प्रस्तावाला नकार दिला असून मुंबईत १०० जागा लढण्यावर ठाम असल्याचे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील वरिष्ठ नेत्यांनी सांगितले. तसेच भाजपने काही दगाफटका करण्याचा प्रयत्न केला, तर स्वतंत्र लढण्याची रणनीती आखली आहे, असा दावा शिवसेनेतील या वरिष्ठ नेत्याने केला आहे. दरम्यान, येत्या आठवड्यात शिवसेना आपले पत्ते खोलणार असल्याचे संकेत या नेत्याने दिले. दरम्यान, भाजप व एकनाथ शिंदे यांची शिवसेना या दोघांमध्ये १५० जागांवर एकमत झाले, असा दावा दोन्ही पक्षांकडून करण्यात येत आहे.

विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाल्याने महायुतीतील नेत्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. महायुतीतील भाजपचे व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे स्वतःचे मतदार आहेत. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या कामामुळे जनतेच्या पसंतीस ते उतरले आहेत. त्यामुळे भाजपने अगदीच ताणून धरले तर शिवसेना गप्प बसणार नाही. भाजपने मुंबईत ६० जागांवर निवडणूक लढण्याचा प्रस्ताव दिला असून कुठे उमेदवार उभे करायचे हेही प्रस्तावात नमूद केले आहे. मात्र, शिवसेनेचीही मुंबईत ताकद असून शिवसेनेला मानणारा वर्ग मुंबईत आहे. मुंबईत २० टक्के मतदार शिवसेनेचे असून उबाठाचे ३४ टक्के, तर भाजपचे २४ टक्के मतदार मुंबईत आहेत. मुंबईत ५५ ते ६५ टक्के मतदान होते, असा गेल्या काही निवडणुकीतील अंदाज आहे. त्यामुळे मुंबईत शिवसेना आपले वर्चस्व राखून आहे, याचा विचार भाजपच्या नेत्यांनी करणे गरजेचे आहे, असे या शिवसेना नेत्याने सांगितले.अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची मुंबईत फारशी ताकद नाही. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीकडून शिवसेना व भाजपच प्रमुख पक्ष आहेत. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेत महायुतीचा झेंडा फडकवण्यासाठी भाजपने जागावाटपाबाबत तडजोडीची भूमिका घेतली पाहिजे, असे या शिवसेना नेत्याने सांगितले.

अमित शहा यांच्या भेटीनंतर भाजप नेत्यांची नरमाईची भूमिका

विधानसभा निवडणुकीत महायुतीला विजय मिळाल्यानंतर भाजपच्या काही नेत्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत स्वबळाचा नारा दिला होता. मात्र, शिवसेना नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री आमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली. अमित शहा यांच्या भेटीनंतर भाजपच्या नेत्यांनी नरमाईची भूमिका घेतली आहे, असेही या शिवसेना नेत्याने सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in