एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहणार

देवेंद्र फडणवीस : अजित पवारांना याची पूर्ण कल्पना
एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहणार

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना वाटू शकते की, अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत. भाजपच्या कार्यकर्त्यांना वाटू शकते की, आपला नेता मुख्यमंत्री व्हावा. तसे वाटण्यात गैर काहीच नाही. मात्र, मी अधिकृतपणे या महायुतीतील मोठ्या पक्षाचा नेता म्हणून सांगतो की, महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच राहतील. दुसरा कोणीही नेता मुख्यमंत्री होणार नाही. याबाबत अजित पवार आणि मी आमच्या दोघांच्याही मनात पूर्ण स्पष्टता असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. महायुतीची चर्चा झाली तेव्हा अजित पवार यांना त्याची स्पष्ट कल्पना देण्यात आली होती. त्यांनी ती स्वीकारली देखील असल्याचे फडणवीस म्हणाले.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लवकरच एकनाथ शिंदे अपात्र ठरतील आणि अजित पवार मुख्यमंत्री होतील, असे भाकीत केले आहे. तसेच काही ठिकाणी अजितदादा मुख्यमंत्री, असे बॅनर्सही लागले होते. त्यावरून विविध चर्चांना ऊत आला आहे. त्याबाबत विचारले असता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘मी अधिकृतपणे या महायुतीतील मोठ्या पक्षाचा नेता म्हणून सांगतो, महायुतीचे मुख्यमंत्री शिंदेच राहतील, दुसरा कोणीही नेता मुख्यमंत्री होणार नाही. याबाबत अजित पवार आणि माझ्या मनात पूर्ण स्पष्टता आहे. महायुतीची चर्चा झाली तेव्हा अजित पवार यांना त्याची स्पष्ट कल्पना देण्यात आली होती. त्यांनी ती स्वीकारली देखील. तसेच त्यांनी त्यांच्या वक्तव्यातूनही हे स्पष्ट केले. महायुतीतील लोक जी वक्तव्ये करत आहेत, त्यांनी तसे संकेत देणे तत्काळ थांबवावे. कारण त्यामुळे महायुतीत संभ्रम निर्माण होतो.’’

फडणवीस म्हणाले, ‘‘पृथ्वीराज चव्हाण जे बोलले, तशा प्रकारची पतंगबाजी अनेक लोक करतात. अनेक लोक आता राजकीय भविष्यवेत्ते झाले आहेत. पण, कितीही संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तरी आठ, नऊ किंवा दहा ऑगस्टला काहीच होणार नाही. झालेच तर आमच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. मुख्यमंत्री शिंदे ठरवतील, त्या तारखेला विस्तार होईल. माझे वक्तव्य आमच्या लोकांच्या कानउघाडणीकरिता पुरेसे आहे. आमचे लोक समजूतदार आहेत, त्यांना इशारा मिळाला आहे. कोणाला काही वाटावे, यात गैर नाही. पण बोलताना प्रत्येकाने वास्तवाचे भान ठेवले पाहिजे, असेही फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाचा ठराव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल गौरवोद्गार काढल्याबद्दल विधानसभेत सत्ताधारी पक्षाच्या वतीने मोदी यांचे ऋण व्यक्त करणारा तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन करणारा विशेष ठराव सोमवारी विधानसभेत मांडण्यात आला. शिंदे यांचे निकटवर्ती आणि राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी हा ठराव मांडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी दिल्लीत जाऊन सहकुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली होती. या भेटीनंतर मोदी यांनी मराठीत ट्विट करून एकनाथ शिंदे यांच्या कार्यशैलीची मुक्तकंठाने प्रशंसा केली होती.

निधीवाटपात अन्याय नाही

‘‘आता जे निधीवाटपावरून आम्हाला शहाणपण शिकवत आहेत, त्यांनी अडीच वर्षांच्या आघाडीच्या काळात हे शहाणपण तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना शिकवायला हवे होते. त्यावेळी भाजपच्या आमदारांना फुटकी कवडीही दिली नव्हती. पण, त्यांनी गाय मारली म्हणून आम्ही वासरू मारावे, असे नाही. मेरिटनुसार सर्व आमदारांना निधी मिळेल. मुंबई महापालिकेत आंधळे दळतेय कुत्रे पीठ खातेय, अशी परिस्थिती होती. पण हे तर काहीच नाही, असे इतरही मोठे घोटाळे मुंबई महापालिकेत असल्याचेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in