

मुंबई : कुलाबा विधानसभा मतदारसंघात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उमेदवारांना धमकावल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. मात्र, राज्य निवडणूक आयोगाने नार्वेकर यांच्यासह निवडणूक निर्णय अधिकारी कृष्णा जाधव यांना ‘क्लीनचिट’ दिली आहे.
कुलाबा विधानसभा मतदारसंघातील प्रभागांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यास गेलेल्या जनता दल आणि आम आदमी पक्षाच्या उमेदवारांचे अर्ज वेळेच्या कारणावरून नाकारण्यात आले, याप्रकरणी तक्रारीनंतर ‘ए’ वॉर्डचे निवडणूक निर्णय अधिकारी कृष्णा जाधव यांच्या कृतीबाबत राज्य निवडणूक आयोगाला पालिकेने पाठविलेल्या अहवालात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची कृती नियमाला धरून जरी असली तरी प्रशासकीय कार्याला अनुकूल नव्हती, असे मत नोंदवले आहे.
कुलाबा विधानसभा मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकारी कृष्णा जाधव यांची कृती कायद्याच्या दृष्टीने योग्य असली तरी व्यावहारिक आणि प्रशासकीयदृष्ट्या योग्य नसल्याचे पालिकेच्या अहवालात नमूद करण्यात आले. मात्र, वेळेनंतर कोणाचाही अर्ज स्वीकारला जात नाही हा नियम सर्वत्र लागू असल्याने जाधव यांनी केलेल्या कृतीचे राज्य निवडणूक आयोगाने समर्थन केले आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची ५ वाजताची वेळ संपण्यापूर्वी कृष्णा जाधव यांच्या दालनात जे उमेदवार होते त्यांचे अर्ज स्वीकारण्यात आले, तर जाधव यांनी पाच वाजता आपल्या दालनाचे दरवाजे बंद करीत त्यानंतर आलेल्या उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यास नकार दिला. उमेदवारांना टोकन देण्यात आले होते, असे म्हटले जात असले तरी त्या टोकनवर ‘प्रिसायडिंग ऑफिसर’ची सही नसल्याने ते टोकन ग्राह्य मानले जात नाहीत, असेही राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
नार्वेकर यांनी दबाव आणल्याचा आरोप
प्रभाग २२५, २२६, २२७ हे पालिकेच्या ‘ए’ प्रभागांतर्गत येतात. या ठिकाणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे नातेवाईक निवडणूक लढवत आहेत. अर्ज दाखल करण्याच्या वेळी नार्वेकर तेथे उपस्थित होते. त्यांनी दबाव आणल्याचा आरोप आप व अन्य उमेदवारांनी केला आहे. याच प्रभागातून जनता दल आणि आम आदमी पक्षाचे उमेदवारही निवडणूक लढविण्यास इच्छुक होते.
निवडणूक अधिकाऱ्याविरोधातील तक्रार जनता दलाकडून मागे
मुंबईतील महापालिका निवडणुकीत नामनिर्देशन प्रक्रियेत झालेल्या कथित अनियमिततेप्रकरणी कुलाबा परिसरातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांविरोधात दाखल केलेली तक्रार जनता दल (सेक्युलर) पक्षाने मागे घेतली आहे. मात्र, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कथित हस्तक्षेपाविरोधातील वैयक्तिक तक्रार आपण पुढे चालू ठेवणार असल्याचे जदचे (एस) नेते व माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी स्पष्ट केले.