

मुंबई : निवडणूक आयोगाची गलथान आणि मनमानी कार्यपद्धत तसेच उमेदवारांवर विविध विभागांतून एनओसी आणण्याची सक्ती करण्याच्या निर्णयाविरोधातील याचिका शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली.
मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अखंड यांच्या खंडपीठाने, निवडणूक प्रक्रिया आधीच पार पडली आहे. निवडणुकीच्या तोंडावर यात हस्तक्षेप करणे योग्य नाही. हस्तक्षेप केल्यास सगळीच प्रक्रिया बारगळून निवडणुकीच्या वेळापत्रकावर त्याचा थेट परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या टप्प्यावर या याचिकेवर सुनावणी घेणे योग्य ठरणार नाही, असे स्पष्ट करत याचिकाकर्त्यांना दिलासा देण्यास नकार देत याचिका फेटाळून लावली.
मुंबई महापालिका आगामी निवडणुकीसाठी २२७ प्रभागांमधील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी उमेदवारी अर्जासोबत पाणी, कर, पोलीस अशा विविध विभागांची ना हरकत प्रमाणपत्रे नसल्याने उमेदवारी अर्ज अतितांत्रिक कारणांमुळे फेटाळून लावले. केवळ तांत्रिक आणि नियमबाह्य कारणास्तव उमेदवारी अर्ज फेटाळण्याचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आक्षेप घेत अपक्ष उमेदवार मोझम अली मीर यांनी ॲॅड. मोईनुद्दीन चौधरी यांच्या मार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
याचिकेत निर्णय रद्द करण्याची विनंती
आयोगाचा निर्णय हा मनमानी आणि नियमबाह्य असल्याने तो रद्द करावा आणि अर्ज त्वरित स्वीकारण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती याचिकेत केली आहे. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अखंड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी आयोगाच्या वतीने ॲॅड. सच्छिन्द्र शेट्ये यांनी याचिकेलाच जोरदार आक्षेप घेतला. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला तेव्हाच सर्व उमेदवारांसाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे हा आयत्यावेळी घेण्यात आलेला निर्णय नाही. निवडणुकीत पारदर्शकता राहावी आणि योग्य उमेदवारांना संधी मिळावी याच हेतूने हा निर्णय घेण्यात आला. तसेच याप्रकरणी जनहित याचिका दाखलच होऊ शकत नाही त्यामुळे ही याचिका फेटाळून लावण्याची मागणी आयोग आणि पालिकेच्यावतीने करण्यात आली.
भाजपच्या भोजनेंची उमेदवारी कायम
मुंबई : निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आपल्या अधिकारांचा मनमानी आणि गैरवापर करू नये, या शब्दांत कानउघाडणी करत मुंबई उच्च न्यायालयाने नवी मुंबई महापालिकेच्या वाशी येथील प्रभाग क्र. ‘१७-अ’मधील निवडणुकीला दिलेली स्थगिती उठवली आहे. तांत्रिक कारणाने इथून उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आलेले भाजप उमेदवार निलेश भोजने यांची उमेदवारी स्वीकारत त्यांच्या नावाचा चिन्हासह यादीत समावेश करून वाशीतील प्रभाग १७ अ मधील निवडणुकीला दिलेली स्थगिती उठवत नियोजित वेळापत्रकानुसार निवडणुका घेण्याचे आदेश हायकोर्टाने दिले.
भोजने यांचा उमेदवारी अर्ज शिवसेना जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांच्या तक्रारीवरून फेटाळण्यात आला होता. (अधिक वृत्त महाराष्ट्र पानावर)