विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार अधिवेशनाच्या अखेरच्या टप्प्यात निवड

अजित पवार विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देत थेट सरकारमध्ये सहभागी होऊन उपमुख्यमंत्री झाले
विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार अधिवेशनाच्या अखेरच्या टप्प्यात निवड

मुंबई : पावसाळी अधिवेशन संपण्याला फक्त दोन दिवस बाकी असतानाच अखेर विधानसभेला विरोधी पक्षनेता मिळाला. विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेसचे विदर्भातील ओबीसी नेते विजय वडेट्टीवार विराजमान झाले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांच्या नावाची घोषणा करताच सर्व सदस्यांनी बाके वाजवून त्यांचे स्वागत करत अभिनंदन केले.

अजित पवार विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देत थेट सरकारमध्ये सहभागी होऊन उपमुख्यमंत्री झाले. अजित पवार यांनी ३० जून रोजी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर विरोधी पक्षनेतेपद रिक्त होते. विधानसभेत काँग्रेस हा मोठा विरोधी पक्ष ठरल्याने त्यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला होता. काँग्रेसने १ ऑगस्ट रोजी विधानसभा अध्यक्षांना पत्र देत विजय वडेट्टीवार यांच्या नावाची शिफारस करणारे पत्र दिले होते. गुरुवारी अध्यक्षांनी विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी वडेट्टीवार यांच्या नावाची घोषणा केली. अध्यक्षांच्या घोषणेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार तसेच काँग्रेस गटनेते बाळासाहेब थोरात यांनी प्रथेनुसार वडेट्टीवार यांना त्यांच्या आसनावर नेऊन विराजमान केले आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

विरोधी पक्षनेता निवडीस विलंब झाला, याचे खापर माझ्यावर फोडू नका. विरोधी पक्षनेते म्हणून विजय वडेट्टीवारांची निवड करणारे पत्र माझ्याकडे दोन दिवसांपूर्वी आले. मला जेव्हा पत्र मिळाले तेव्हा मी निवड केली आहे. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील यांनीही जितेंद्र आव्हाड यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यासंदर्भात पत्र दिले होते. ते त्यांनी आता मागे घेतले आहे, त्यानंतर वडेट्टीवार यांच्या नावाची मी घोषणा केली, असे विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले.

सत्तेविरुद्ध इमानदारीने लढेन

‘‘सत्ताधाऱ्यांकडे आज २०० पेक्षा जास्त संख्याबळ आहे. अशा परिस्थितीत त्यांच्याशी लढायचे कसे, असे मला विचारण्यात आले. पण, लढायला सामर्थ्य आणि इमानदारी असावी लागते, ती माझ्याकडे आहे. संख्याबळाच्या आधारे आम्हाला दाबण्याचा प्रयत्न करू नका. हे लोकशाहीला घातक आहे. हे आपल्या संस्कृतीला, परंपरेला, उद्याच्या पिढीला घातक आहे, असे विजय वडेट्टीवार यावेळी म्हणाले.

वडेट्टीवार वर्क फ्रॉम होमवाले नाहीत -मुख्यमंत्री

‘‘विजय वडेट्टीवार हे ‘वर्क फ्रॉम होम’ करणारे नेते नसून ते रस्त्यावर उतरून काम करणारे आहेत. रस्त्यावर उतरल्याशिवाय, लोकांशी संवाद साधल्याशिवाय त्यांच्या समस्या समजत नाहीत. आपल्याविरोधात वातावरण असले तरी लोकांना भेटायचे असते, त्यांना समजून घ्यायचे असते, पण खुर्ची गेल्याच्या दु:खातून काहीजण सावरलेले नाहीत, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वडेट्टीवार यांना शुभेच्छा देताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता चिमटा काढला.

वडेट्टीवार विदर्भाचा बुलंद आवाज -फडणवीस

‘‘विजय वडेट्टीवार हे विदर्भाचा बुलंद आवाज आहेत. सर्वसामान्य जनतेच्या भल्यासाठी काम करताना या पदाचा ते मान-सन्मान वाढविण्यासाठी चांगले काम करतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. २०१९ साली अजित पवार आधी माझ्याबरोबर उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर उद्धव ठाकरेंबरोबर उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर विरोधी पक्षनेते झाले. आता पुन्हा उपमुख्यमंत्री झाले. त्यांच्याखालोखाल मी आहे. मी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मग विरोधी पक्षनेता झालो. आता उपमुख्यमंत्री झालो’, असे फडणवीस म्हणताच सभागृहात हशा पिकला. पण आता काही बदल नाही आहे. आम्ही तिघेही आहे त्याच पदावर राहणार आहोत. आता जी जबाबदारी मिळाली, त्यात मी अतिशय आनंदी आहे. काम करायला मजा येत आहे,’’ असेही फडणवीस म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in