कुलाबा बेस्ट भवनात इलेक्ट्रिक चार्जिंगची सुविधा; एका वेळी १४ बस चार्ज करण्याची क्षमता

सध्या बेस्ट भवन येथे इलेक्ट्रिक चार्जिंग पॉइंट कार्यरत आहे.
कुलाबा बेस्ट भवनात इलेक्ट्रिक चार्जिंगची सुविधा; एका वेळी १४ बस चार्ज करण्याची क्षमता

मुंबई : पर्यावरणाच्या संवर्धनासाठी बेस्ट उपक्रमाने इलेक्ट्रिक बसेस घेण्यावर भर दिला आहे. इलेक्ट्रिक बसेसमुळे पर्यावरणाचा समतोल राखत प्रदूषणावर नियंत्रण मिळवणे ही शक्य होते. त्यामुळे बेस्ट उपक्रमाच्या पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक बसेसचा समावेश करण्यात येत आहे. इलेक्ट्रीक बसेस चार्ज करण्यासाठी विविध बस आगारात चार्जिंग स्टेशन उभारण्यात येत असून कुलाबा येथील बेस्ट भवनात ही चार्जिंग स्टेशन उभारण्याचे काम प्रगतीपथावर आहे. एका वेळी १४ बसेस चार्ज करण्याची सुविधा येथे आहे.

सध्या बेस्ट भवन येथे इलेक्ट्रिक चार्जिंग पॉइंट कार्यरत आहे. तेथे बेस्टची आणि बाहेरील चारचाकी वाहने चार्ज करण्यात येतात. मात्र बेस्ट उपक्रमाने एकाच वेळी अनेक बसगाड्या चार्ज करता येतील या उद्देशाने आणखी चार्जिंग स्टेशन उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

सध्या बेस्टच्या स्वतःच्या मालकीच्या ११३६ बसगाड्या कार्यरत आहेत. तर बेस्टने तोटा कमी करण्यासाठी भाडे तत्वावर १७७८ बसगाड्या घेतल्या आहेत. एकूण २९१४ बसगाड्या बस ताफ्यात आहेत. तसेच बेस्टमध्ये बेस्टच्या मालकीच्या - २४५ साध्या बसगाड्या, सीएनजी गॅसवरील - ६२५ बसगाड्या, इलेक्ट्रिक बसगाड्या- ८८५ अशा एकूण ११३६ बसगाड्या आहेत. तर,भाडे तत्वावर साध्या बसगाड्या - २८०, सीएनजी गॅसवरील - १०२५ बसगाड्या, इलेक्ट्रिक बसगाड्या ४७३ अशा एकूण १,७७८ बसगाड्या आहेत. त्यामुळे बेस्टच्या स्वतःच्या आणि भाडे तत्वावरील बसगाड्या असे मिळून बेस्ट उपक्रमात एकूण २,९१४ बसगाड्या आहेत. सध्या पर्यावरणाच्या दृष्टीने इलेक्ट्रिक बसगाड्या या जास्त अनुकूल आहेत. या इलेक्ट्रिक बसगाड्यांमध्ये इंजिनचा आवाज येणे, इंधनाचा धूर निघून डोळ्यांना त्रास होण्याच्या तक्रारी नाहीत. त्यामुळे आता आगामी काळात टप्प्या - टप्प्याने १०० टक्के बसगाड्या इलेक्ट्रिक बसगाड्या बेस्टच्या बस ताफ्यात आणण्यात येणार आहेत. या इलेक्ट्रिक बसगाड्या चार्ज करण्यासाठी चार्जिंग पॉइंट निर्माण केले जात आहेत. त्यानुसारच बेस्ट भवन , इलेक्ट्रिक हाऊस येथे एकाच वेळी १४ इलेक्ट्रिक बसगाड्या चार्ज करता येणार आहेत.

चार्जिंग पॉईंट्स‌ कुठे व किती?

बॅकबे डेपो - २५, वरळी - १२, काळाकिल्ला - २०, शिवाजी नगर - १९ व मालवणी - १९

logo
marathi.freepressjournal.in