ऑक्टोबरपासून ठाणे, बोरिवली-पुणे या मार्गावर धावणार 'शिवनेरी' ऐवजी इलेक्ट्रिक 'शिवाई बस'

सध्याच्या शिवनेरी बस धावणार दादर-पुणे मार्गावर; एसटी महामंडळाचे नियोजन सुरु
ऑक्टोबरपासून ठाणे, बोरिवली-पुणे या मार्गावर धावणार 'शिवनेरी' ऐवजी इलेक्ट्रिक 'शिवाई बस'
ANI

ठाणे आणि बोरिवलीहून पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांना कमी किंमतीत तसेच आरामदायी वाहतूक सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी एसटी महामंडळाकडून पावले उचलण्यास सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर येत्या ऑक्टोबरपासून ठाणे, बोरिवली-पुणे या मार्गावर धावणाऱ्या शिवनेरी बसेसऐवजी इलेक्ट्रिक शिवाई बसेस चालवण्याचा विचार प्रशासनाकडून करण्यात येत आहे. परंतु या नियोजनावेळी दादर-पुणे दरम्यान शिवनेरी बसेस मात्र कायम राहतील अशी माहिती एसटी महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आलिया आहे.

१ जूनपासून पहिली शिवाई बस पुण्याहून अहमदनगरसाठी रवाना करण्यात आली. या बसेस १२ मीटर लांब असून त्यांची आसन क्षमता ४३ असून त्या सरासरी ८० किमी प्रति तासाच्या वेगाने धावतात. या बसमध्ये प्रत्येक प्रवाशासाठी रिक्लाईनिंग सीट्स आणि बिल्ट-इन यूएसबी चार्जिंग पॉइंट आहेत. ते सुरळीत प्रवासासाठी रीजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टमसह तांत्रिकदृष्ट्या प्रगत आहेत. शिवाई बस केवळ शून्य उत्सर्जनच नव्हे तर शून्य आवाजाचेही पालन करतात; ते जीपीएस उपकरणे, दिव्यांग प्रवाशांसाठी रॅम्प, सीसीटीव्ही कॅमेरे आणि पॅनिक बटणाने सुसज्ज आहेत. या बसेसमधून होणाऱ्या आरामदायी आणि सुरक्षित प्रवासामुळे पुणे- अहमदनगर मार्गावरील इलेक्ट्रिक बस सेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. हीच बाब लक्षात घेत ठाणे, बोरिवलीहून ये जा करणाऱ्या प्रवाशांकडून देखील इलेक्ट्रिक बसची मागणी केली जात आहे.

ठाणे-स्वारगेट, बोरीवली- स्वारगेट या मार्गांवर शिवनेरी बसला अल्प प्रतिसाद

ठाणे ते स्वारगेट, ठाणे ते शिवाजी नगर, बोरीवली ते स्वारगेट आणि बोरिवली ते शिवाजी नगर या चार मार्गांवर शिवनेरी बसेसला मागील काही महिन्यांपासून अल्प प्रतिसाद मिळत आहे. या बसेसची मागणी देखील कमी होऊ लागल्याचे एसटीतील वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटींवरून सांगितले. परिणामी या चार मार्गांवर लवकरच शिवाई बसेस सुरू होतील आणि एका तिकिटाची किंमत अंदाजे ३५० ते ३७५ रुपयेदरम्यान असेल. सध्या शिवनेरी बस प्रति प्रवासी ४५० आकारतात. यामुळे येणाऱ्या दिवसात प्रवाशांना आरामदायी, सुरक्षित कमी खर्चिक असा ठाणे, बोरिवली- पुणे असा प्रवास अनुभवता येणार आहे. तर ठाणे आणि बोरिवलीहून पुण्याला जाणाऱ्या शिवनेरी बस आता दादर-पुणे या मार्गावर वळवण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

१५० एसी इलेक्ट्रिक बसेसची ऑर्डर देण्यात आली आहे. वितरणाचा पहिला टप्पा ऑक्टोबरमध्ये अपेक्षित आहे. त्यापैकी काही पुणे मार्गावर वापरण्याची योजना सुरु आहे.

- शेखर चन्ने, व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in