
अग्निसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्याबाबत मुदत देऊनही दुर्लक्ष करणे मुंबई सेंट्रल येथील सिटी सेंटर मॉलला महागात पडले. सिटी सेंटर मॉलची वीज व पाणी कनेक्शन कट करण्यात आल्याची माहिती मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख हेमंत परब यांनी दिली.
मुंबईतील आगीच्या घटना टाळण्यासाठी अग्निसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करणे प्रत्येकाला बंधनकारक करण्यात आले आहे. अग्निसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित केली की नाही, याची तपासणी करण्याचा निर्णय अग्निशमन दलाने घेतला होता. मुंबईतील ६९ मॉलची तपासणी केली असता ६५ मॉलमध्ये अग्निसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित केल्याचे दिसून आले. नोव्हेंबर २०२०मध्ये सिटी सेंटर मॉलमध्ये अग्नी तांडव पहावयास मिळाले होते. तब्बल ७२ तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात मुंबई अग्निशमन दलाला यश आले होते. त्यानंतर मॉलमध्ये अग्नी सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी काही दिवस बंद ठेवण्याचे निर्देश मॉल प्रशासनाला देण्यात आले होते. मॉल सुरु केल्यानंतर ही अग्निसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित नसल्याचे दिसून आले. त्यामुळे १ डिसेंबर, २०२१ रोजी सिटी सेंटर मॉलची वीज व पाणी कनेक्शन कट करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.