मुंबई : पश्चिम रेल्वेने ३२० स्थानकांवर इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणाली सुरू केली आहे. या प्रणालीमुळे ट्रेनच्या हालचालीवर अचूक नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे. यासह गाड्यांचा वेग वाढण्याबरोबरच अपघात टाळण्यास मदत होणार आहे.
प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि वेळेत व्हावा यासाठी पश्चिम रेल्वेने अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतली आहे. त्यानुसार इलेक्ट्रिकल सिग्नलिंग इंस्टॉलेशन्सना नवीन संगणक आधारित इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टमचा आधार देण्यात येत आहे. पश्चिम रेल्वेने ५१३ इंटरलॉक केलेल्या स्थानकांपैकी ३२० स्थानकांना युनिव्हर्सल फेल सेफ ब्लॉक इन्स्ट्रुमेंटसह संगणक आधारित इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणाली प्रदान केली आहे. उर्वरित स्थानके देखील भविष्यात प्रगत इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणालीने सुसज्ज करण्यात येणार आहेत. सिग्नल, पॉइंट्स आणि लेव्हल-क्रॉसिंग गेट्स नियंत्रित करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग संगणक आधारित प्रणाली आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करण्यात येतो.
पारंपरिक इलेक्ट्रिकल रिले इंटरलॉकिंग सिस्टममध्ये असंख्य वायर आणि रिले वापरण्यात येतात. मात्र इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणाली इंटरलॉकिंग लॉजिक व्यवस्थापित करण्यासाठी सॉफ्टवेअर आणि इलेक्ट्रॉनिक घटक वापरते. हे यार्डमधील सिग्नलिंग गीअरमधून मिळालेल्या इनपूटचे वाचन करते आणि ऑपरेशनल कन्सोलकडून प्राप्त झालेल्या आदेशानुसार काम करते.