'मानिकी' उपचारासाठी 'वनतारा'मध्ये दाखल; वर्षानुवर्षांच्या यातनांनंतर वेदनादायी प्रवासाचा अंत

गेल्या ४८ वर्षांपासून ‘मानिकी’ने या पृथ्वीवर आपला प्रवास केला आहे. मात्र, अलीकडच्या वर्षांत तिचे प्रत्येक पाऊल कमालीचे वेदनादायी बनले होते. तिच्या डाव्या पुढच्या पायातील जुन्या व्यंगामुळे तिला चालणे अत्यंत कठीण झाले होते.
मानिकी हत्तीण
मानिकी हत्तीणछायाचित्र : वनतारा
Published on

मुंबई : गेल्या ४८ वर्षांपासून ‘मानिकी’ने या पृथ्वीवर आपला प्रवास केला आहे. मात्र, अलीकडच्या वर्षांत तिचे प्रत्येक पाऊल कमालीचे वेदनादायी बनले होते. तिच्या डाव्या पुढच्या पायातील जुन्या व्यंगामुळे तिला चालणे अत्यंत कठीण झाले होते. वाढत्या वयाशी संबंधित आरोग्य समस्या, संसर्ग झालेले निकामी पाय, एका डोळ्याची अधू झालेली दृष्टी, शरीरातील पाण्याचे कमी झालेले प्रमाण आणि खालावलेली शारीरिक स्थिती यामुळे तिच्या यातनांमध्ये आणखी भर पडली होती.

आसाममधील एका महामार्गावरून मानिकीला वैद्यकीय उपचारासाठी नेत असताना ती वेदनेने विव्हळत लंगडत चालत असल्याचा एक व्हिडिओ समोर आला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तिची ही दयनीय अवस्था संपूर्ण देशासमोर आली. या दृश्यांनी देशभरातील नागरिकांचे मन हेलावून टाकले. यानंतर संवेदनशील नागरिक, प्राणी कल्याण कार्यकर्ते आणि सर्वसामान्यांनी एकत्र येत तिच्या तातडीच्या उपचारासाठी आणि काळजीसाठी आवाज उठवला. ऑनलाइन याचिकांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या, आवाहन केले गेले आणि मानिकीची परिस्थिती हा सर्वांच्याच चिंतेचा विषय बनली.

दरम्यान, मानिकीसाठी तो वेदनादायी प्रवासाचा काळ आता संपला असून ‘वनतारा’मध्ये तिच्या आयुष्यातील काळजी, उपचार आणि शांततेचा एक नवीन अध्याय सुरू होत आहे.

मिळणार अद्ययावत उपचार

वनतारा येथे मानिकीला अत्याधुनिक रुग्णालय सेवा, निरंतर उपचार आणि तिच्या सुखाचा व आरोग्याचा विचार करून तयार केलेले एक कायमस्वरूपी घर मिळणार आहे.

निसर्गाच्या सानिध्यात होणार सुटका

मानिकीला केवळ औषधोपचारच नव्हे, तर एक नैसर्गिक वातावरणही मिळणार आहे. तिच्या जखमी पायावरील ताण कमी करण्यासाठी मऊ माती आणि नैसर्गिक जमीन, पायांचे वजन हलके वाटण्यासाठी पाण्याचे तलाव, नैसर्गिकरित्या चारा शोधण्याची सुविधा आणि इतर हत्तींचा सहवास तिला दिला जाईल. यामुळे तिला दररोज आवश्यक असणारी काळजी, आराम आणि सन्मान मिळू शकेल.

तिला एका सुरक्षित आणि विशेष काळजी केंद्रात सर्वसमावेशक पशुवैद्यकीय उपचारांची गरज आहे. तिची लंगडत चालण्याची पद्धत, शरीरातील पाण्याचे कमी प्रमाण, अशक्तपणा आणि संसर्ग झालेल्या जखमांमुळे तिच्यावर दीर्घकालीन उपचार करणे आवश्यक आहे. औषधोपचार, हायड्रोथेरपी (जलचिकित्सा) आणि अ‍ॅक्युपंक्चरच्या माध्यमातून तिच्या वेदना कमी करणे, जखमांवर उपचार करणे आणि योग्य पोषण आहार देणे ही आमची तात्कालिक प्राथमिकता आहे.

प्रवक्ता, वनतारा

logo
marathi.freepressjournal.in