मुंबई : ब्रिटिशकालीन एलफिन्स्टन पूल तोडून नवीन पूल उभारण्याचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने हाती घेतले आहे. शुक्रवारी रात्री बारा वाजल्यापासून पूल वाहतुकीसाठी बंद होत आहे. वाहतुकीतील बदलामुळे परळ स्थानकातील एसटीच्या तिकीटात वाढ होणार आहे.
परळ एसटी आगाराच्या साध्या, सेमी आणि शिवशाही बसच्या मार्गात बदल केला आहे. एसटीच्या बस मडके बुवा चौक (परळ टी. टी. जंक्शन) येथून सरळ घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गाने कृष्ण नगर जंक्शन, परळ वर्कशॉप, सुपारी बाग जंक्शन, भारतमाता जंक्शन, संत जगनाडे चौक येथे उजवे वळण घेऊन साने गुरुजी मार्गाने चिंचपोकळी पुलावरून कॉम्रेड गुलाबराव गणाचार्य चौक (चिंचपोकळी जंक्शन) वरून उजवे वळण घेऊन एन. एम. जोशी मार्गाने, एसटीच्या परळ आगारात येतील व त्याच मार्गाने परत जातील. किमीच्या वाढीमुळे एक टप्पा तिकीट दरात वाढ होणार आहे.
विद्युत शिवनेरी व शिवनेरी बससाठी दादर ते परळ जाताना दादर टीटी सर्कल, टिळक पूल, कबुतरखाना येथून उजवे वळण घेऊन भवानी शंकर रोड, शारदाश्रम, गोपीनाथ चव्हाण चौककडून डावीकडे वळण घेऊन परळ बस स्थानकात जाणार आहेत. परळ ते दादर येताना बाबुराव परुळेकर मार्गावरून डावीकडे वळण घेऊन भवानी शंकर मार्ग येथून उजवीकडे वळण घेऊन कबुतरखाना येथून दादर टी.टी. सर्कल मार्गे दादर शिवनेरी बस स्थानक येथे जातील. यामुळे ०.९ किमीने वाढ होईल. विद्युत शिवनेरी व शिवनेरी बसच्या दादर ते परळ व परळ ते दादर प्रवासात वाढ होईल. या दोन्ही बसच्या तिकीट दरात वाढ होणार आहे.
पाडकामास स्थानिकांचा तीव्र विरोध; पूल बंद करण्यासाठी पोलीस बंदोबस्त
एलफिन्स्टन उड्डाणपूल बंद करण्यास पुन्हा एकदा स्थानिकांनी तीव्र विरोध केला आहे. रहिवाशांचे पुनर्वसन, पर्यायी पादचारी पुलाची उभारणी आणि नवीन पूल उभारणीचा निश्चित कालावधी जाहीर करण्याची मागणी रहिवाशांनी लावून धरली आहे. तर रात्री १२ वाजल्यापासून पूल बंद करण्यासाठी मोठ्या संख्येने पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परेल व प्रभादेवी रेल्वे स्थानकावरील पूर्व - पश्चिमेला जोडणारा एलफिन्स्टन पूल तोडून त्याठिकाणी नवीन पूल तसेच शिवडी-वरळी एलिव्हेटेड कनेक्टर उड्डाणपुलाचे काम मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणामार्फत करण्यात येणार आहे. या कामासाठी एलफिन्स्टन पुला मार्गे जाणारी वाहतूक शुक्रवारी रात्री १२ वाजल्यापासून बंद करण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. एप्रिल महिन्यात स्थानिकांनी पूल बंद करण्यास विरोध केला होता. यावेळी प्रशासनाने दिलेली आश्वासने न पाळताच पुन्हा पूल बंद करण्याचा घाट घातला आहे. यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त याठिकाणी तैनात करण्यात आला आहे. येथील दोन इमारतींमधील १०० लोकांचे पुनर्वसन न करताच पूल बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्याने स्थानिक संतप्त झाले आहेत. स्थानिक आमदार कालिदास कोळंबकर यांनीही रहिवाशांच्या पुनर्वसनावरून प्रशासनाला धारेवर धरले आहे. यातच विविध राजकीय पक्षांनीही पूल बंद करण्यास विरोध केला आहे. पूर्व पश्चिमेला ये जा करण्यासाठी पर्यायी पूल उभारण्यात आला आहे. मात्र तो अद्याप खुला करण्यात आलेला नाही. तर रहिवाशांचे पुनर्वसन न करताच पूल बंद करण्यात येत असल्याने आमचा त्याला विरोध आहे. पूल तोडण्यास आणि नवीन पूल बांधण्यास आमचा विरोध नसून केवळ रहिवाशांच्या मागण्या पूर्ण न केल्याने पूल बंद करण्यास विरोध असल्याचे, मनसेचे प्रभाग क्रमांक १९५चे शाखाध्यक्ष मंगेश कसालकर यांनी सांगितले.