पूल बंद; हाल सुरू! एलफिन्स्टन पुलाचे पाडकाम अखेर सुरू; दादर, परळमध्ये प्रचंड वाहतूककोंडी, गैरसोयीने परिसरातील रहिवासी संतप्त
मुंबई : एलफिन्स्टन उड्डाणपुलाचे पाडकाम अखेर शुक्रवारी मध्यरात्रीपासून सुरू झाले. यासाठी पुलावरील वाहतूक बंद करण्यात आल्याने ब्रिटिशकालीन तसेच येथून जाणाऱ्या वाहनांचे मार्ग अन्यत्र वळविण्यात आल्याने दादर, परळसारख्या परिसरात शनिवारी-पहिल्याच दिवशी प्रचंड वाहतूककोंडी झाली. परिसरातील रहिवाशांचीही गैरसोय झाली असून त्यांनी प्रशासनावर संताप व्यक्त केला आहे.
मुंबईचे केंद्रस्थान असलेल्या दादर आणि परळ यामधील पूर्व व पश्चिम उपनगराला जोडणारा दीडशे वर्षे जुना एलफिन्स्टन उड्डाणपूल पाडण्याचे काम याबाबतची घोषणा झाल्यानंतर काहीशा विलंबाने शुक्रवारी रात्रीपासून सुरू झाले. यासाठी दादर ते करी रोड दरम्यानची पूर्व व पश्चिमेला होणारी वाहतूक तातडीने वळविण्यात आली आहे.
मात्र दादरमधील टिळक पूल तसेच चिंचपोकळी व करी रोड रेल्वे स्थानकावरील पूल यावरील वर्दळ वाढली. वाहनांची लांब रांग होऊन कोंडी निर्माण झाली. तर परिसरातील रहिवाशांचीही गैरसोय झाली. जाणारी एलफिन्स्टन पुलावरून वाहतूक शुक्रवारी रात्री १२ वाजेपासून बंद करण्यात आली. रहिवाशांकडून पूल बंद करण्यास विरोध झाल्यानंतरही पोलिसांनी बंदोबस्तात पूल बंद केला.
पुलावर बॅरिकेट लावून वाहतूक बंद करण्यात आल्यानंतर पुलावरील रस्ता खोदण्यात आला. यामुळे सर्वच वाहनांची वाहतूक ठप्प झाली. सकाळनंतर दादर (पूर्व), परळ (पूर्व) भागात मोठी वाहतूक कोंडी झाली. सायन रेल्वे उड्डाणपूल यापूर्वीच बंद करण्यात आल्याने सायन, किंग सर्कल परिसरात वाहतूक कोंडीत आणखी भर पडली आहे. एल्फिन्स्टन पूल परिसरात २० सप्टेंबरपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. १२ सप्टेंबरच्या रात्री सुरू झालेले हे काम एकूण ६० दिवस सुरू राहणार आहे. पूल तोडून त्याठिकाणी नवीन पूल तसेच शिवडी -वरळी एलिव्हेटेड कनेक्टर उड्डाणपुलाचे काम मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणामार्फत करण्यात येणार आहे.
पुनर्वसनासाठी रहिवाशांचे आंदोलन
शुक्रवारी रात्री परिसरातील रहिवाशांनी आंदोलन केले. पुलाच्या पाडकामाचा परिणाम येथील १९ इमारतींवर होणार आहे. या इमारतीतील ३७० कुटुंबे बाधित होणार आहेत. रहिवासी त्यांचे पुनर्वसन याच परिसरात व्हावे अशी मागणी करत आहेत. हाजी नूरानी आणि लक्ष्मी निवास इमारतीजवळ दोन मोठे खांब उभारण्याचा आराखडा आहे. इतर रहिवाशांनाही भविष्यात आपली इमारत बाधित होईल अशी भीती आहे.
रुग्ण, नातेवाईकांचे हाल
एलफिन्स्टन परिसरात केईएम, टाटा, वाडिया अशी महत्त्वाची रुग्णालये आहेत. या भागात वाहतूककोंडी झाल्याने रुग्णालयात जाणाऱ्या रुग्णांचे हाल सुरू झाले आहेत. चार ते पाच किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांची रांग होती. परळ येथील रुग्णालय परिसरात वाहतूककोंडी होऊन रेल्वे स्थानक तसेच बस स्थानक येथून येणाऱ्या मुंबईबाहेरील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना रस्ते मार्गे वळसा घालून रुग्णालय गाठावे लागत आहे.
सोमवारपासून अधिक कोंडी होणार
-पूल पाडल्याच्या पहिल्याच दिवशी शनिवारी माहीम, माटुंगा, दादर, परळ, करी रोड, चिंचपोकळी भागात वाहतूककोंडी झाली. सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी मुंबईच्या मध्यवर्ती भागात अधिक कोंडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परळ तसेच प्रभादेवी परिसरात असलेल्या खासगी कंपन्यांच्या कार्यालयांची संख्या लक्षात घेता नव्या आठवड्यापासून येथे अधिक गर्दी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.