
मुंबई : अटल सेतूला थेट वांद्रे-वरळी सी लिंकला जोडणी देण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या वरळी-शिवडी उन्नत मार्गिकेसाठी १२५ वर्ष जुना एलफिन्स्टन पूल पाडण्यात येणार आहे. यासाठी स्थानिकांना विश्वासात न घेता पूल पाडण्याआधी मुंबईकरांकडून सूचना हरकती मागवण्यात आल्या. मात्र, याबद्दल बाधित होणाऱ्या जी. मी. टॉवर इमारत आणि इराणी इमारतीतील नागरिकांशी चर्चा न करताच पूल पाडण्याचा निर्णय घेण्यात आल्याने स्थानिकांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळत आहे. याविरोधात बाधित नागरिकांनी शिवसेना ठाकरे गटाच्या आमदार आणि पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने स्वाक्षरी मोहीम राबवून, साखळी उपोषण करून सरकार, महापालिका आणि एमएमआरडीएविरोधात निषेध नोंदवला.
शिवडी-वरळी उन्नत मार्गामुळे एलफिन्स्टन पूलनजीक राहणाऱ्या स्थानिकांना अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. याविरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकारी, बाधित नागरिकांकडून साखळी उपोषण आणि स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.
प्रभादेवी रेल्वे स्थानकावरील पुलाच्या दोन्ही बाजूस नागरिकांना व स्थानिक रहिवाशांना जाण्याच्या व येण्याच्या व्यवस्थेचे काय, व्यापारी व फेरीवाल्यांच्या रोजगाराचे काय, डॉ. आंबेडकर रोडवरील अतिरिक्त होणाऱ्या वाहतुकीचे कायमस्वरूपी नियोजन करणे, डॉ. आंबेडकर रोडवर दुतर्फा रहिवाशांचे रस्ता क्राॅसिंगचे नियोजन काय, प्रभादेवी येथून येणाऱ्या रुग्णांच्या वाहतूक मार्गाचे नियोजन काय केले, असे प्रश्न सरकारला व संबंधित यंत्रणेला विचारण्यात आले.
पुलाला विरोध नाही, सरकारने संबंधित प्रश्नांचे निरसन करावे. या ठिकाणी बाधित होणारे अनेक कुटुंब आहेत. ज्यामध्ये वयोवृद्ध नागरिक राहतात. त्यांना विश्वासात न घेताच एमएमआरडीएने पूल तोडण्याचा निर्णय जाहीर केला. अधिकारी चुकीची माहिती देत असल्यामुळे येथील नागरिक संभ्रमात आहेत.
- मिनार नाथाळकर, शाखाप्रमुख
गेल्या वर्षभरापासून एलफिन्स्टन पूल तोडण्यात येणार आहे. असे बाधित इमारतीतील १०० कुटुंबीयांना सांगण्यात आले. तसेच , त्यांचे पुनर्वसन विभागात असलेल्या म्हाडाच्या इमारतीत करणार असल्याचे आश्वासन एमएमआरडीएच्या वतीने देण्यात आले. परंतु, त्यांचे पुनर्वसन न करताच पूल तोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, तर इमारतीच्या फलकावर कोणत्याही यंत्रणेचे नाव न लिहिता नोटीस बजावण्यात येत आहे. त्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
- उल्हास पांचाळ, रहिवासी