एल्फिन्स्टन पुलावर हातोडा? परळ-दादर भागातील वाहतूककोंडीत हाेणार वाढ

शहरातील मध्यवर्ती भागात असलेला १२५ वर्षे जुना एल्फिन्स्टन रोड ओव्हर ब्रिज पाडण्याची योजना मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) आखली आहे.
एल्फिन्स्टन पुलावर हातोडा? परळ-दादर भागातील वाहतूककोंडीत हाेणार वाढ
एक्स @rajasekharaa
Published on

मुंबई : शहरातील मध्यवर्ती भागात असलेला १२५ वर्षे जुना एल्फिन्स्टन रोड ओव्हर ब्रिज पाडण्याची योजना मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) आखली आहे. त्यामुळे आधीच वाहतूककोंडीचा सामना करावा लागत असलेल्या परळ, दादर भागात नागरिकांना वाहतूककोंडीला सामोरे जावे लागणार आहे.

शिवडी-वरळी उन्नत कनेक्टर प्रकल्पाचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (एमएमआरडीए) करण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या कामासाठी वाहतूक पोलिसांनी वाडिया रुग्णालयासमोरील आचार्य दोंदे मार्ग आणि एल्फिन्स्टन रोड बंद करण्याची परवानगी दिली आहे. सायन उड्डाणपूल बंद करण्यात आल्याने विविध भागात वाहतूककोंडी वाढली आहे. या कोंडीमुळे वाहनचालक हैराण झाले असतानाच आता एल्फिन्स्टन पूल तोडण्यात येणार असल्याने मुंबईकरांची डोकेदुखी आणखी वाढणार आहे.

शिवडी-वरळी उन्नत कनेक्टर उभारणे आणि एल्फिन्स्टन पुलाची उंची आणि रुंदी वाढविण्यासाठी हा पूल तोडण्यात येणार आहे. हे प्रकल्प प्रत्यक्षात आल्यानंतर येथे रेल्वे रुळांवर डबलडेकर पूल असेल. अटल सेतूच्या १५ टक्के वाहन वाहतुकीसाठी हा कनेक्टर वापरला जाईल, असा अंदाज आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर कनेक्टरमुळे शिवडी ते वरळी हा प्रवासाचा वेळ सध्याच्या ४०-६० मिनिटांवरून १० मिनिटांपेक्षा कमी होण्याची अपेक्षा आहे. या कनेक्टरमध्ये चार लेन असतील. शिवडी-वरळी उन्नत कनेक्टरचे काम वेगाने सुरू आहे. मात्र एल्फिन्स्टन पुलाच्या पाडकामाबाबत निविदा अद्याप निघालेली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

एल्फिन्स्टन पूल परीक्षेनंतर तोडा : आदित्य ठाकरे

एल्फिन्स्टन पूल ऐन परीक्षेच्या कालावधीत तोडल्यास विद्यार्थ्यांची गैरसोय होणार आहे. त्यामुळे परीक्षा संपल्यानंतर या पुलाचे काम सुरू करावे, अशी मागणी आमदार आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. तसेच वरळी-शिवडी कनेक्टरचे प्रलंबित काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे अशी आग्रही मागणीही त्यांनी केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in