सातारा मतदारसंघावरून महायुतीत पेच; अजित पवारानंतर आता भाजपचा दावा

उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे नुकतेच रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे शिबिर पार पडले. या शिबिरात अजित पवार यांनी साता-यासह शिरुर, रायगड, बारामती लोकसभा मतदारसंघावर दावा केला.
सातारा मतदारसंघावरून महायुतीत पेच;
अजित पवारानंतर आता भाजपचा दावा

मुंबई : शरद पवारांच्या पावसातील ऐतिहासिक सभेने गाजलेल्या व मोदी लाटेतही २०१९ साली श्रीनिवास पाटील यांच्या गळ्यात विजयाची माळ घालणाऱ्या सातारा लोकसभा मतदारसंघावरुन महायुतीत आता पेच निर्माण झाला आहे.अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने या जागेवर दावा केला आहे.तर आता भारतीय जनता पक्ष व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटानेही या मतदारसंघावर हक्क सांगण्यास सुरुवात केली आहे.

मिनी लोकसभा झाल्याने आता लोकसभेच्या हालचाली वेगात सुरू झाल्या असून, आता सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातही सर्वच पक्ष आता तयारीला लागले आहेत. महायुतीतही जागा वाटपांबाबत दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत. मात्र, साता-यासह शिरुर, मावळ, नगरच्या जागेवरून बेबनाव निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. साता-यात तर अजित पवार गटासह भाजप आणि शिंदे गटानेही दावा केला आहे. त्यामुळे महायुतीत पेच वाढला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे नुकतेच रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे शिबिर पार पडले. या शिबिरात अजित पवार यांनी साता-यासह शिरुर, रायगड, बारामती लोकसभा मतदारसंघावर दावा केला. मात्र, यात साता-याच्या जागेवरून महायुतीतील वाद चव्हाट्यावर आला आहे. आतापर्यंत या जागेवर राष्ट्रवादीविरोधात भाजपने लढा दिला आहे. त्यामुळे भाजप ही जागा सहजासहजी सोडण्याची शक्यता कमीच आहे. कारण भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी आज सातारा लोकसभा मतदारसंघ भाजपचाच आहे. मागील चार वर्षांत भाजपने येथे ताकदीने काम केले आहे. त्यामुळे कुणी काहीही भूमिका घेतली तरी सातारा मतदारसंघ भाजपकडेच राहणार आणि या ठिकाणी आम्हीच लढणार, असा पवित्रा घेतला आहे. आमदार जयकुमार गोरे यांचे हे विधान थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विधानाला आव्हानच असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे महायुतीत जागा वाटपाचा वाद टोकाला जाऊ शकतो. त्यामुळे या जागेवरून महायुतीत टोकाचा वाद होऊ शकतो.

दरम्यान, सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशीच लढत होत आली आहे. मात्र, २००९ आणि २०१९ ला हा मतदारसंघ शिवसेनेला सोडण्यात आला होता. यात २००९ मध्ये शिवसेनेकडून पुरुषोत्तम जाधव यांनी निवडणूक लढविली होती, तर २०१९ मध्ये नरेंद्र पाटील यांनी निवडणूक लढविली. मात्र, दोन्हीही वेळी शिवसेनेला पराभव स्वीकारावा लागला, तरीही त्यांनी मोठे मताधिक्य मिळविले. त्यामुळे या जागेवर शिवसेना शिंदे गटाचाही दावा आहे. या एका जागेवरूनच नाही, तर शिरुर, मावळ, अहमदनगर येथील लोकसभेच्या जागेवरूनही जागावाटपात बेबनाव होऊ शकतो, असेच सध्याचे चित्र आहे.

शिंदे गटाचीही तयारी

सातारा लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाचीही ताकद जास्त आहे. त्यातच शिंदे गटाचे नेते पुरुषोत्तम जाधव यांनी तर अगोदरच या मतदारसंघावर दावा केला आहे. विशेष म्हणजे पुरुषोत्तम जाधव यांनी या अगोदर उदयनराजे यांच्या विरोधात निवडणूक लढली, त्यावेळी मोठे मताधिक्य घेतलेले आहे. त्यामुळे ते या जागेचा दावा सोडायला तयार नाहीत. यावरून वाद रंगण्याची शक्यता आहे.

logo
marathi.freepressjournal.in