मुंबई : आयात-निर्यातीचे लायसन्स देण्याची बतावणी करुन एका व्यावसायिकाची २३ लाख ४० हजाराची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध टिळकनगर पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. या दोघांमध्ये पुनित ठक्कर आणि सुनिल गुप्ता यांचा समावेश असून, त्यांच्याविरुद्ध अपहारासह फसवणुकीच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल झाल्याचे पोलिसांनी सांगितले. अंगद कुलदीप राजपूत यांचा आयात-निर्यात लायसन्स ट्रेडिंग व्यवसाय असून, त्यांच्या अंगद नावाच्या कंपनीत ड्यूटी फ्री आयात-निर्यातचे लायसन्स खरेदी-विक्रीचा काम केले जाते. काही महिन्यांपूर्वी त्यांची पुनित ठक्करशी ओळख झाली होती.
या ओळखीनंतर त्याने त्यांना सोळा लायसन्स देण्याचे मान्य केले होते. त्याची किंमत २३ लाख ४० हजार रुपपये इतकी होती. हा व्यवहार पक्का झाल्यानंतर त्यांनी पुनितच्या बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर केली होती; मात्र दिलेल्या मुदतीत त्याने त्यांना सोळा लायसन्स दिले नाही. त्यामुळे त्यांनी त्याच्याकडे पैशांची मागणी सुरु केली होती. पैसे किंवा लायसन्स दे असे सांगूनही त्याने त्यांना काहीच प्रतिसाद दिला नाही. लायसन्स न मिळाल्याने लायसन्ससाठी घेतलेल्या २३ लाख ४० हजाराचा अपहार केल्याप्रकरणी अंगद राजपूत यांनी टिळकनगर पोलिसांत तक्रार केली.