
मुंबई : तीन महिन्यांसाठी घेतलेल्या हेव्ही डिपॉझिटचा अपहार केल्याप्रकरणी एका महिलेविरुद्ध साकीनाका पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. स्मिता श्रीकृष्ण वाघ असे या महिलेचे नाव असून तिची लवकरच चौकशी होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. तक्रारदारांना तीन महिन्यांसाठी भाड्याने एक रूमची गरज होती. याच दरम्यान त्यांना कुर्ला येथील कमानी, सुंदरबाग, वराडकर चाळीत राहणाऱ्या स्मिता वाघ यांची रूम तीन लाखांच्या हेव्ही डिपॉझिटवर घेण्याचे ठरवले. त्यांच्यात १ एप्रिल ते ३० जून २०२३ या तीन महिन्यांसाठी करार झाला होता. १ एप्रिलला ते राहण्यासाठी गेले, मात्र तीन महिन्यांचा करार संपण्यापूर्वीच त्यांच्या रूममध्ये एक महिला राहण्यासाठी आली. तिनेही स्मितासोबत ११ महिन्यांचा करार केला होता. हा धक्का बसल्यानंतर त्यांनी हेव्ही डिपॉझिटचे पैसे मागितले. स्मिता यांनी धनादेश दिला, मात्र तो बँकेत टाकू नका म्हणून सांगितले. पैशांविषयी टाळाटाळ होत असल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी साकिनाका पोलिसांत तक्रार केली होती.