
मुंबई : चेन्नई आणि तामिळनाडूच्या ज्वेलर्स व्यापाऱ्यांना विक्रीसाठी दिलेल्या सव्वाकोटी रुपयांच्या दागिन्यांचा अपहार करून फसवणूक केल्याप्रकरणी कंपनीचा अधिकारी सोनी सखारिया याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा नोंदविल आहे. सोनी हा पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी एमआयडीसी पोलिसांचे एक विशेष पथक लवकरच चेन्नईला जाणार आहे. सी. पी टँक परिसरात राहणारे तक्रारदार ज्वेलर्स व्यापारी असून, मुंबईसह देशभरातील विविध ज्वेलर्स व्यापाऱ्यांना त्यांना सोने, हिरे आणि प्लॅटिनम दागिन्यांची विक्री करतात. त्यांच्याकडे सोनी सखारिया हा डिस्ट्रीब्युटर आणि मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह अधिकारी म्हणून काम करत होता. त्यांनी त्याला कंपनीत घेताना त्याच्यावर चेन्नई आणि तामिळनाडूच्या ज्वेलर्स व्यापाऱ्यांची जबाबदारी सोपविली होती. गेल्या वर्षी त्याने दिलेल्या ऑर्डरनंतर कंपनीने चेन्नईला सुमारे सव्वाकोटी रुपयांचे ३१०० ग्रॅम वजनाचे ३३७ नग हिरेजडीत सोने आणि प्लटिनमने बनविलेले चैन, ब्रेसलेट, कडा, अंगठी, पँडल सेट आदी दागिने पाठवून दिले होते. यावेळी त्याने ३० दिवसांचे पेमेंट मिळेल असे सांगितले होते; मात्र दोन ते तीन उलटूनही त्याने दागिन्यांचे पेमेंट केले नाही. याबाबत विचारणा केल्यानंतर तो त्यांना विविध कारण सांगून टाळण्याचा प्रयत्न करत होता.