
मुंबई : मुंबई-कॅनडा विमान तिकिटसह मनी एक्सचेंजसाठी तीन कॉलेज विद्यार्थ्यांकडून घेतलेल्या पैशांचा अपहार करून फसवणूक करणाऱ्या एका महिलेस बोरिवली पोलिसांनी अटक केली. वीणा किशोर आंबेरकर असे या महिलेचे नाव असून, फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत तिला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. वीणाने अशाच प्रकारे इतर काही विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याचे बोलले जाते. हार्दिक दिपक परब हा त्याच्या कुटुंबीयांसोबत बोरिवली येथे राहत असून, त्याने विलेपार्ले येथील साठे कॉलेजमध्ये कॉमर्समधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी त्याने कॅनडाच्या अंबर कॉलेजमध्ये अर्ज केला होता. एका वर्षांच्या शिक्षणासाठी त्याला वीस लाखांचा खर्च येणार होता. त्यासाठी त्याला ५ सप्टेंबरला तिथे जावे लागणार होते. ऑनलाईन तिकिट बुकींगसाठी त्याने वीणा आंबेरकरशी संपर्क साधला होता. तिने त्याला विमान तिकिटासह मनी एक्सचेंज करून देते असे सांगून त्याच्याकडून कमिशनसह तिकिट आणि मनी एक्सचेंजसाठी १ लाख ३३ हजार रुपये घेतले होते.