मेडिकल कॉलेजच्या प्रवेशासाठी घेतलेल्या पैशांचा अपहार, खाजगी कंपनीच्या दोन पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

मेडीकल कॉलेजच्या प्रवेशासाठी घेतलेल्या पैशांचा अपहार केल्याप्रकरणी एका खाजगी कंपनीच्या दोन पदाधिका-‍याविरुद्ध विलेपार्ले पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मेडिकल कॉलेजच्या प्रवेशासाठी घेतलेल्या पैशांचा अपहार, खाजगी कंपनीच्या दोन पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
Published on

मुंबई : मेडीकल कॉलेजच्या प्रवेशासाठी घेतलेल्या पैशांचा अपहार केल्याप्रकरणी एका खाजगी कंपनीच्या दोन पदाधिका-‍याविरुद्ध विलेपार्ले पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आदित्य मौर्या आणि मंजित सिंग अशी या दोघांची नावे असून ते दोघेही संकल्प इनलाईटमेंट ऍण्ड सर्व्हिसेस कंपनीचे पदाधिकारी आहेत. पळून गेलेल्या या दोघांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

यातील तक्रारदार महिला विलेपार्ले येथे तिच्या कुटुंबियांसोबत राहात असून ती शिक्षिका आहे. तिच्या मुलाला पुण्याच्या काशिबाई नवले मेडीकल कॉलेजमध्ये एमबीबीएससाठी प्रवेश हवा होता. त्यासाठी तिचे प्रयत्न सुरू असताना तिच्या परिचित नातेवाईकांनी मंजित आणि आदित्यविषयी माहिती दिली होती. त्यामुळे गेल्या वर्षी तिने या दोघांची त्यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली होती.

यावेळी या दोघांनी तिच्या मुलाला मेडीकल कॉलेजमध्ये प्रवेश देण्याचे आमिष दाखवून प्रोसेसिंगसाठी १५.५० लाख रुपये घेतले होते. ऑगस्ट महिन्यांत पेमेंट करून त्यांनी ऑक्टोंबरपर्यंत मुलाला प्रवेश मिळवून दिला नाही. वारंवार विचारणा करूनही त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे महिलेने कॉलेज प्रवेशासाठी दिलेल्या पैशांची मागणी सुरू केली होती. परंतू त्यांनी पैसे न देता तिची फसवणूक केली होती. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच तिने विलेपार्ले पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर या दोघांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. 

logo
marathi.freepressjournal.in