
मुंबई : आपत्कालीन परिस्थितीत धोक्याचा इशारा देणारे भोंगे २० वर्षे जुने झाले असून ते कालबाह्य झाले आहेत. त्यामुळे नवीन अद्ययावत आधुनिक तंत्रज्ञानाने विकसित स्वयंचलित भोंगा इशारा प्रणाली खरेदी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. भोंगे इशारा प्रणालीची चाचपणी करण्यासाठी ७ जणांची तांत्रिक समिती स्थापन करण्यात आली असून राज्य सरकारने याबाबत शासन निर्णय जारी केला आहे.
बृहन्मुंबई नागरी संरक्षण शहरातील भोंगा इशारा प्रणालीला २० वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला असून प्रणाली कालबाह्य झाली आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत इशारा देणारे भोंगे नव्याने बसवण्यासाठी भारत संचार निगम लि. व महानगर टेलिफोन निगम लि. यांच्याकडील अद्यावत तंत्रज्ञानाने विकसित केलेले स्वयंचलित भोंगे मध्यवर्ती नियंत्रण केंद्रामधून नियंत्रित करणारे उपकरण संचासह बसविण्यात यावेत, अशा सूचना नवी दिल्ली येथील नागरी संरक्षण महासंचालकांनी दिल्या आहेत.
त्यानुसार महानगर टेलिफोन निगम लिमिटेड, मुंबई यांच्याकडून अद्ययावत व आधुनिक तंत्रज्ञानाने विकसित केलेली स्वयंचलित भोंगा इशारा प्रणाली खरेदी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या भोंगा इशारा प्रणालीच्या चाचणीसाठी तांत्रिक समिती स्थापन करण्याबाबत नागरी संरक्षण संचालनालयाने प्रस्तावित केले आहे. नागरी संरक्षण संचालनालयाने शिफारस केल्यानुसार या भोंगा इशारा प्रणालीची चाचणी घेऊन तांत्रिकदृष्ट्या उपयुक्त व किफायतशीर प्रणाली खरेदी करण्याची शिफारस शासनास सादर करण्यासाठी तांत्रिक समिती स्थापन करण्यात आली आहे.
अशी आहे समिती !
- संचालक, नागरी संरक्षण, महाराष्ट्र राज्य - अध्यक्ष
- उप सचिव, भाभा ॲटोमिक रिसर्च सेंटर, मुंबई - सदस्य
- पोलीस उपायुक्त, बिनतारी संदेश, बृहन्मुंबई - सदस्य
- अधिक्षक अभियंता (विद्युत), सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक मंडळ - सदस्य
- प्राचार्य, आयआयटी, पवई - सदस्य
- महाव्यवस्थापक, महानगर टेलिफोन निगम लि. - सदस्य
- वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी (चालन व भांडार), नागरी संरक्षण
- संचालनालय, महाराष्ट्र राज्य - सदस्य