
व्हॉटस्ॲॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम या सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी तऱ्हेतऱ्हेचे ‘इमोजी’ वापरले जातात. हसणारे, रडणारे, आनंद व्यक्त करणारे, प्रेम व्यक्त करणारे, ठेंगा दाखवणाऱ्या ‘इमोजी’चा लोकप्रिय आहेत. याच ‘इमोजी’चा वापर आता अंमली पदार्थांचे तस्कर, एजंट तरुण व व्यावसायिकांसाठी करत असल्याने पोलीस व अमली पदार्थविरोधी विभागाला (एनसीबी) धक्का बसला आहे.
गेल्या दशकात रस्त्यावरील अंमली पदार्थांची तस्करी ही ऑनलाईन स्तरावर गेली आहे. डार्कनेटवरून अंमली पदार्थांचे व्यवहार व वितरण होते. याचे पैसेही क्रिप्टोकरन्सीतून दिले जातात. अंमली पदार्थांची ऑर्डर देताना सांकेतिक भाषा व ‘इमोजी’चा वापर केला जातो. व्हॉटसॲॅप, टेलिग्राम, स्नॅपचॅट, इन्स्टाग्राम, मेसेंजर व ट्विटरचा वापर अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी केला जातो.
मुंबई पोलिसांनी काही दिवसांपूर्वी अंमली पदार्थांचा मोठा तस्कर अलीयासागर शिराझीला अटक केली होती. त्याच्या चौकशीतून अंमली पदार्थ तस्करीत सांकेतिक कोड वापरत असल्याचे उघड झाले. शिराझीच्या व्हॉटस्ॲॅप चॅट व टेलिग्राममध्ये ‘व्हाईट शर्ट’ व ‘ग्रीन टी’ असा उल्लेख सापडला होता. त्यातून गुन्हे अन्वेषण विभाग गोंधळात पडला होता. अखेर चौकशीतून खुलासा झाला. ‘व्हाईट शर्ट’म्हणजे कोकेन, ब्लॅक शर्टमध्ये ‘हशिश’, राणी म्हणजे ब्राऊनशुगर, ‘ग्रीन टी’ म्हणजे ‘केटामाईन’ असा अर्थ आहे. हे सर्व अंमली पदार्थ इंग्लंड, अमेरिका व ऑस्ट्रेलियात निर्यात केले जात होते.
अंमली पदार्थाचा बीमोड करायचा असल्यास दोन पातळ्यांवर काम करावे लागणार आहे. अंमली पदार्थांचा पुरवठा रोखणे, तस्करांना पकडणे व समाजात जनजागृकता आणणे. गेल्या सहा महिन्यात पथकाने ४६९७ गुन्हे नोंदवून ४८४.२९८ किलो अंमली पदार्थ जप्त केले. त्याची किंमत ४५ कोटी रुपये आहे.
- प्रकाश जाधव, पोलीस उपायुक्त, अंमली पदार्थविरोधी विभाग
पालक, शिक्षकांना केले सतर्क
काही लोकप्रिय ‘इमोजी’चा वापर अंमली पदार्थ तस्करीसाठी केला जात असल्याचे समजल्यावर मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी विभागाने पालक व शिक्षकांना सतर्क केले आहे.
हे आहेत 'कोड'
मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी विभागाने अंमली पदार्थांसाठी वापरण्यात येणारे ‘इमोजी’ कोड उघड केले. मारिज्युआना, कोकेन, एमडीएमए किंवा एक्टसी, मॅजीक मशरूम, मेथामफाईटन, हेरॉईन आदींसाठी हे कोड वापरले जातात. तरुणांमध्ये ‘मेथ किंवा म्यॅव, म्यॅव’ हे तरुणांमध्ये लोकप्रिय आहेत. त्यासाठी ‘बाऊन्स’, ‘बबल्स’, ‘आयईस’ हे वापरले जाते. पिस्क्रीप्शन पिल्ससाठी बटन्स आणि बच्चू हे नाव वापरले जाते.
मोबाईल फूड डिलीव्हरी ॲॅपचा तस्करीसाठी वापर
पुणे पोलिसांनी गेल्या महिन्यात पाच तरुणांना अंमली पदार्थ तस्करीत पकडले. मोबाईल फूड डिलीव्हरी ॲॅपचा वापर अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी करत होते. त्यांच्याकडून ५३ लाखांचे एलएसडी ब्लॉटस् जप्त केले. अंमली पदार्थांच्या तस्करांच्या मोबाईल फोनच्या डेटाचे विश्लेषण केले. तेव्हा अनेक अंमली पदार्थांसाठी ‘इमोजी’चा वापर केल्याचे दिसून आले. ग्राहकांकडून विशिष्ट अंमली पदार्थ हवा असल्यास ठराविक ‘इमोजी’ वापरला जात होता. पुणे पोलिसांनी हे ‘इमोजी’ ट्विट करून तरुण व पालकांना सतर्क केले आहे.
मुंबईत मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थांची मागणी
मुंबईत मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांची मागणी असते. एलएसडी, पीसीपी, ॲॅम्पेटायमिन, मेथाक्वालीन, बार्बीटुयरेटस् हे पार्टीत वापरले जातात. तर नाईट क्लबमध्ये ओपायटीस, कॅनबीज, प्रीपेरशन, कोका अल्कालॉईड आदींचा वापर होतो. रात्रपाळीचे कर्मचारी, डिलीव्हरी एजंट, कॉल सेंटर, बीपीओ कर्मचारी याचा वापर करतात.