मुंबई : मुंबई महापालिकेची केईएम नायर सायन कूपर ही प्रमुख रुग्णालये असून, १७ सर्वसाधारण रुग्णालये आहेत. पालिका रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला दर्जेदार उपचार मिळावे यासाठी आरोग्य यंत्रणा अधिक बळकट करण्यासह रुग्णालयातील वातावरण आरोग्यदायी असावी यासाठी रुग्णालयाच्या स्वच्छतेवर भर दिला जात आहे.
डॉ. सुधाकर शिंदे यांनी ५ जून रोजी अतिरिक्त आयुक्त पदाची धुरा सांभाळताच पालिका रुग्णालयातील स्थितीचा आढावा घेण्यासाठी दोन महिन्यांत १०० हून अधिक वेळा मध्यरात्री, दिवसा सरप्राइज व्हिजीट केल्या. आरोग्य विभागाची मुख्य जबाबदारी स्वीकारल्यानंतर पालिका रुग्णालयात रुग्णांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासह स्वच्छ रुग्णालयासाठी त्यांनी विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. स्वतः डॉक्टर असल्याने आरोग्य विभाग अधिक सक्षम करण्यासाठी शिंदे 'ऑन फिल्ड' काम करत आहेत.
महापालिकेची एकूण पाच वैद्यकीय महाविद्यालये व रूग्णालये कार्यरत आहेत. परळ येथील राजे एडवर्ड स्मारक रुग्णालय (केईएम), बा. य. ल. नायर सर्वोपचार रुग्णालय, लोकमान्य टिळक सर्वोपचार रुग्णालय, डॉ. रु. न. कूपर रुग्णालय, नायर रुग्णालय दंत महाविद्यालय यांचा समावेश होतो. या वैद्यकीय संस्थांमधील एकूण रुग्णशय्यांची संख्या ही सुमारे १२ हजार ४६२ इतकी आहे. त्याचप्रमाणे, एकूण १७ उपनगरीय रुग्णालये कार्यरत आहेत. या १७ रुग्णालयांमध्ये सुमारे ३ हजार २४५ रुग्णशय्या आहेत. तसेच समर्पित पाच विशेष रूग्णालये कार्यरत आहेत. कस्तुरबा रुग्णालय, ऍक्वर्थ कृष्ठरोग रूग्णालय, मुरली देवरा महानगरपालिका नेत्र रूग्णालय; क्षयरोग रूग्णालय शेठ आत्मसिंग जेसासिंग बांकेबिहारी कान, नाक व घसा रूग्णालय यांचा समावेश आहे. महानगरपालिकेची ही सर्व रुग्णालये अव्याहतपणे रुग्णसेवा पुरवत असतात. त्यामध्ये प्राथमिक उपचारांपासून ते विशेषज्ज्ञांच्या सेवा, अतिविशेष उपचार सेवा यांचादेखील समावेश आहे. मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांच्या निर्देशानुसार, आरोग्य सेवेचे अधिकाधिक बळकटीकरण करण्यासाठी नागरिकांच्या, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, कामगार यांच्या काय अपेक्षा व गरजा आहेत, याचा शिंदे प्रत्यक्ष संवाद साधत डॉ. आढावा घेत असल्याने कार्यवाहीला वेग आला आहे.
के. ई. एम. रूग्णालयाला शिंदे यांनी गुरुवार, १० ऑगस्ट मध्यरात्रीनंतर भेट दिली. तिसऱ्या मजल्यावरील वॉर्ड क्रमांक ३७ येथे दिलेल्या भेटी दरम्यान संपूर्ण यंत्रणा स्वच्छतेसाठी कार्यरत होती. वॉर्डातील पंख्यांची तसेच भिंतीवरील जळमटे काढणे, प्रसाधनगृहे, खिडक्या, वऱ्हांडे, पायऱ्या व परिसरातील स्वच्छता, पेव्हरब्लॉक आणि आसन व्यवस्था यांची आवश्यक तेथे दुरुस्ती इत्यादी कामे होत असल्याचे आढळले.
केईएम रूग्णालयात ४८४ खासगी कर्मचाऱ्यांमार्फत स्वच्छता
केईएम रूग्णालयात ४८४ खासगी कर्मचाऱ्यांमार्फत तर रोजंदारीवरील आणि महानगरपालिकेच्या मिळून ७२३ कर्मचाऱ्यांच्या मदतीने संपूर्ण परिसराची नियमित स्वच्छता करण्यात येत आहे. त्याशिवाय भटक्या प्राणी आणि मूषक नियंत्रणासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. सर्व रूग्णालयांत काटेकोरपणे स्वच्छता मोहीम होत असून, कर्मचारी तसेच रूग्णालय प्रशासनाने स्वच्छतेसाठी चांगली कामगिरी केली आहे.
सायन रूग्णालयात खासगी ४०४ खासगी कर्मचारी
सायन रूग्णालयात २ लाख चौरस फुटाच्या परिसराची स्वच्छता करण्यासाठी खासगी संस्थेमार्फत ४०४ मनुष्यबळ कार्यरत आहे. तर ३१५ सफाई कर्मचाऱ्यांचीही मदत घेतली जात आहे. भटक्या प्राण्यांचा उपद्रव टाळण्यासाठी ब्रीक्स संस्थेच्या ५३ कामगारांची मदत घेतली जात आहे.
१५०० उंदरांचा नायनाट!
पावसाळ्याच्या काळात मूषकांच्या उपद्रवाचा त्रास हा रूग्णालयातही होतो. त्यामुळे मूषक नियंत्रणासाठी रुग्णालयांच्या आवारात विशेष मोहीम राबवण्याच्या सूचना शिंदे यांनी दिल्या होत्या. त्यानुसार, महानगरपालिकेच्या कीटकनाशक विभागाने अल्पावधीतच दोनवेळा मूषक नियंत्रण मोहीम राबवली. या मोहीमेत सुमारे १ हजार ५०० मूषकांचा नायनाट करण्यात आले आहे.