मुंबई : ढाक्कुमाक्कुम ढाक्कुमाक्कुमच्या तालावर व डीजेच्या ठेक्यावर थिरकत आठ ते नऊ थरांचे मानवी मनोरे रचून मुंबईत मंगळवारी विविध ठिकाणी दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा झाला. अधूनमधून पावसाच्या सरीने गोविंदांच्या उत्साहात भर पडली. विधानसभा निवडणुका जवळ आल्याने या उत्सवाला यावेळी राजकीय रंग चढला होता. विविध पक्षांच्या राजकीय नेत्यांमध्ये दहीहंडीत लाखो रुपयांची बक्षिसे लावण्यासाठी चढाओढ दिसून आली. दरम्यान, सुरक्षेची काळजी घेऊनही मुंबईत सायंकाळपर्यंत दहीहंडी उत्सवात १०६ गोविंदा जखमी झाल्याने या सणाला काहीसे गालबोट लागले.
राजकीय नेते, सेलिब्रिटी तसेच काही दहीहंडी उत्सवात खुद्द मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली. ठिकठिकाणी ‘गोविंदा आला रे, आला’ची धून, तर काही ठिकाणी लेझीम पथकाचा ताल अशा जल्लोषात मुंबईत दहीहंडीचा उत्सव पार पडला. अनेक ठिकाणी चित्तथराराक पाच, सहा ते ९ थरांचे मानवी मनोरे रचले गेले. काळाचौकी, लालबाग, परळ, दादर, वरळी, घाटकोपर, फोर्ट, चेंबूर, जोगेश्वरी आदी ठिकाणी एकावर एक असे चित्तथराराक मानवी मनोरे रचून हंडी फोडण्याचा प्रयत्न झाला. अनेक ठिकाणच्या आयोजकांनी हंडी फोडणाऱ्या गोविंदांसाठी सेफ्टी गियर, जमिनीवर गाद्या, हारनेस्ट आणि रुग्णवाहिकांची सोय केली होती. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या उत्सवात राजकीय नेत्यांचा सहभाग लक्ष वेधून घेणारा होता. दादरसह काही मार्ग बंद करण्यात आले होते. येथील वाहतूक इतर मार्गावरून वळवण्यात आली. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहने रस्त्यावर उतरल्याने वाहतूक कोंडी झाली होती. ठिकठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.
मुंबईतील गल्लोगल्ली, कुलाबा, गिरगाव, ताडदेव, लालबाग, परळ, काळाचौकी, वरळीमधील जांबोरी मैदान व श्रीराम मिल नाका, दादरमधील आयडियलची गल्ली, शिवसेना भवन परिसर यासह पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये विविध ठिकाणी दहीहंडी फोडण्यात आल्या. घाटकोपर, कुर्ला, मागाठाणे, कांदिवली आदी ठिकाणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आदी नेते उपस्थित होते.
जांबोरीत अफजल खान वधाचा देखावा
जांबोरी मैदानातील या कार्यक्रमात सहभागी झालेल्या लोकांनी अफझलखान वधाचा थरारक देखावा पाहून आनंद व्यक्त केला. या देखाव्यामुळे लोकांच्या मनात इतिहासाची आठवण जागृत झाली. उपस्थितांनी आयोजकांचे कौतुक केले आणि दहीहंडी उत्सवाच्या या अनोख्या सादरीकरणाचा आनंद घेतला.
अनेक ठिकाणी दहीहंडी उत्सवात कलाकार आणि अभिनेत्री उपस्थित होते. ते आपल्या चाहत्यांसोबत उत्सवात सहभागी होण्यासाठी आले होते. त्यांच्या उपस्थितीमुळे वातावरणात अधिक उत्साह संचारला. अनेक नामांकित व्यक्तींनी देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहून दहीहंडी उत्सवाची शोभा वाढवली.
बोरीवली, मागाठाणे येथील आमदार प्रकाश सुर्वे, घाटकोपर पश्चिम येथे भाजप आमदार राम कदम यांच्या दहीहंडीला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच इतर नेते उपस्थित होते. भांडुपमध्ये भाजप नेते दीपक दळवी यांनी दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित केला होता. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी येथील चार थराची दहीहंडी फोडली. दक्षिण विभागात ठाकरे गटाकडून दहीहंडी कार्यक्रम आयोजित केला होता. आमदार आदित्य ठाकरे तसेच इतर नेते यावेळी उपस्थित होते.
आठ -नऊ थरांचा थरार
मालाड येथे अमर चक्र गोविंदा पथकाने ८ थर रचत हंडी फोडली. मागाठाणे येथील प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडीत नृत्यांगना गौतमी पाटील यांनी हजेरी लावली. भांडुपमध्ये जय जवान गोविंदा पथकाने नऊ थरांची हंडी उभारत सलामी दिली.
आयडियलची हंडी महिलांनी फोडली
वरळी कोळीवाड्यात ठाकरे गटाकडून दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. युवानेते आदित्य ठाकरे आदी नेते यावेळी उपस्थित होते. दादर येथील आयडियलची दहिहंडी २७ वर्षांपासून आयोजित केली जाते. ही दहीहंडी महिलांच्या पथकांनी फोडली.
महिला गोविंदांकडून आक्रोशाचे बॅनर
भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर यांच्याकडून आयोजित दहीहंडीमध्ये महिला गोविंदांनी पोस्टरबाजी केली. ‘अजून किती विरोध, मेणबत्ती जाळून करायचा, पण नराधमाला कधी जाळायचा’ असे बॅनर या गोविंदानी झळकवले. त्याची चांगलीच चर्चा झाली.
गोविंदांना वेगाची झिंग
गोविंदांनी बाईक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर काढल्या होत्या. या बाईक रस्त्यांवर सुसाट धावताना दिसत होत्या. अनेक गोविदांना वेगाची झिंग चढल्याचे दिसत होते. बाईकस्वारांकडून हेल्मेट वापर केला जात नव्हता. सुरक्षेचे नियम पाळल्याचे दिसत नव्हते. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती.
मुंबईत सायंकाळपर्यंत १०६ गोविंदा जखमी
मुंबईत मंगळवारी दहीहंडी उत्सवात सायंकाळपर्यंत विविध ठिकाणी १०६ गोविंदा जखमी झाले. मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन कक्षातून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई शहर आणि उपनगरात सायंकाळपर्यंत १०६ गोविंदा थर कोसळल्यामुळे जखमी झाले होते. यात पालिका तसेच सरकारी रुग्णालयांबरोबरच खासगी रुग्णालयात रुग्णालयांत दाखल केलेल्या गोविंदांचा समावेश आहे. यापैकी गंभीर जखमी झालेल्या आठ जणांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले आहे. तर २६ जणांवर बाह्य रुग्ण विभागात उपचार करण्यात आले. त्यातील सात जणांना घरी सोडण्यात आले.