मुंबईच्या रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य, रस्त्यांवर १४८ खड्डे पडल्याच्या तक्रारी

एमएमआरडीए व इतर प्राधिकरणाच्या अखत्यारीतील रस्त्यांवर १६४ खड्डे पडले, त्यापैकी १८ बुजवण्यात आले असून १४६ शिल्लक आहेत.
मुंबईच्या रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य, रस्त्यांवर १४८ खड्डे पडल्याच्या तक्रारी

गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. मात्र मुंबईच्या रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. ६ जुलैपर्यंत मुंबई महापालिकेच्या अखत्यारीतील रस्त्यांवर १४८ खड्डे पडल्याच्या तक्रारी आल्या, त्यापैकी फक्त १६ बुजवण्यात आले असून १३२ शिल्लक आहेत. तर एमएमआरडीए व इतर प्राधिकरणाच्या अखत्यारीतील रस्त्यांवर १६४ खड्डे पडले, त्यापैकी १८ बुजवण्यात आले असून १४६ शिल्लक आहेत. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यातून सुरु आहे.

वाढत्या खड्ड्यांमुळे पालिकेची यंत्रणा कामाला लागली आहे. खड्डे बुजवण्यासाठी यंदाही कोल्डमिक्सचा वापर केला जात आहे. यंदा तब्बल तीन हजार मेट्रिक टन कोल्डमिक्स तयार केले जात असून आतापर्यंत २४ विभागांमध्ये सुमारे १५०० मेट्रिक टन कोल्डमिक्सचे वाटप करण्यात आले. २४ विभागांकडून ३०९९ मेट्रिक टन कोल्डमिक्सची मागणी करण्यात आली आहे. मागणीनुसार सुमारे ७० टक्के कोल्ड मिक्सचे वितरण पावसाळ्यापूर्वी आणि त्यानंतर पावसाळ्यात मागणीनुसार व विभागांच्या साठवणूक क्षमतेनुसार वितरण करण्यात येणार आहे, अशी माहिती पालिकेने िदली.

logo
marathi.freepressjournal.in