बेस्ट उपक्रमात कायमस्वरूपी सेवेत घ्या कंत्राटी कामगार भूमिकेवर ठाम

कामगारांच्या संपामुळे सोमवारी ७९८ बसेस विविध आगारात उभ्या राहिल्याने आठवड्याच्या पहिल्या दिवशी प्रवाशांची कोंडी झाली
बेस्ट उपक्रमात कायमस्वरूपी सेवेत घ्या कंत्राटी कामगार भूमिकेवर ठाम

मुंबई : बेस्ट उपक्रमाच्या सेवेत कायमस्वरूपी सामावून घ्या, अन्यथा ‘समान काम, समान वेतन द्या’ या प्रमुख मागण्यांवर कंत्राटी चालक व वाहक ठाम असल्याचे बेस्ट कंत्राटी कर्मचारी समन्वय समितीचे प्रतिनिधी विकास खरमाळे यांनी सांगितले. त्यामुळे कंत्राटी कामगारांनी पुकारलेला बेमुदत संप आणखी चिघळणार आहे. दरम्यान, गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेल्या कंत्राटी कामगारांच्या संपामुळे सोमवारी ७९८ बसेस विविध आगारात उभ्या राहिल्याने आठवड्याच्या पहिल्या दिवशी प्रवाशांची कोंडी झाली.

दरम्यान, कंत्राटी कामगारांशी चर्चा करून संपावर तोडगा काढा अशी सूचना बसेसचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना केली असून कंपनी किंवा कंत्राटी कामगारांवर मेस्मा लावायचा यासाठी कायदेविषयक सल्ला घेत असल्याचे बेस्ट उपक्रमाचे जनसंपर्क अधिकारी सुनील वैद्य यांनी सांगितले.

डागा ग्रुप, हंसा, मातेश्वरी, टाटा, ओलेक्ट्रा, स्विच मोबॅलिटी या कंपनीत चार वर्षांपूर्वी चालक म्हणून सेवेत रुजू झालो. सेवेत येण्याआधी करार केला, त्यावेळी २२ हजार ५०० रुपये वेतन देण्यात येईल, असे नमूद करण्यात आले. मात्र प्रत्यक्षात १७ हजार रुपये पगार हातात मिळतो. साप्ताहिक सुट्टी वेळेत मिळत नाही. त्यामुळे आमची एकप्रकारे फसवणूक होत आहे. ३० दिवसांपैकी २६ दिवस कामावर हजर रहावे लागते. नादुरुस्त बसेस चालवाव्यात लागतात. आमचे हे प्रश्न आजचे नसून चार वर्षांपासून कंत्राटी कामगार हक्कासाठी लढा देत आहेत. बेस्ट उपक्रमातील चालक व वाहक प्रवाशांना सेवा देत असून आम्ही कंत्राटी कामगार ही तीच जबाबदारी पार पाडतो. आता आम्हाला बेस्टच्या सेवेत कायम करून घ्यावे, समान काम समान वेतन अशा विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी बुधवारपासून बेमुदत संप पुकारला असून मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत संप सुरू राहणार असल्याचे खरमाळे यांनी स्पष्ट केले.

आमचे प्रश्न सोडवा

विविध राजकीय पक्षाचे नेते आणि पदाधिकारी आझाद मैदानात बेस्टच्या कंत्राटी कामगारांना भेट देत आहेत. आमच्या प्रश्नाबाबत ज्यांना सहानुभूती आहे, त्यांनी आम्हाला मदत करावी, आमचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी कंत्राटी कामगारांनी केली आहे.

दादर येथे मोर्चा

सहा दिवसांपासून कंत्राटी कामगारांचा संप सुरू असून अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. कंत्राटी कामगार एकत्र लढा देत असून कंत्राटी कामगारांना संघर्ष कामगार कर्मचारी यूनियनने पाठिंबा दिला असून सोमवारी दादर येथे मोर्चा काढण्यात आला. तसेच जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत संप सुरूच राहणार, असे संघर्ष कामगार कर्मचारी युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनी सांगितले.

एसटीच्या १२२ बसेस प्रवाशांच्या सेवेत

एसटी महामंडळाच्या १२२ बसेस प्रवाशांच्या सेवेत सोमवारी रस्त्यावर धावल्या. एसटी महामंडळाकडे १५० बसेसची मागणी केली असून ज्या उपलब्ध होतील तशा बेस्ट प्रवाशांच्या सेवेत रस्त्यावर धावतील, असे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले.

बेस्ट उपक्रमातील बसेसचा ताफा

बेस्टच्या मालकीच्या बसेस - १,३९०

भाडेतत्त्वावरील बसेसची संख्या - १,६७१

एकूण बसेसचा ताफा - ३,०६१

या मागण्यांची पूर्तता करा!

बेस्ट उपक्रमाचे कामगार घोषित करून त्यांना कायम कामगारांच्या सर्व सेवाशर्ती लागू करून सोयसुविधा द्या

समान कामाला समान वेतन या न्यायतत्वाप्रमाणे वेतन त्वरित देण्यात यावे

भाडेतत्वावर बस देणारा कंत्राटदार बदलला तरी सेवेचे सातत्य कायम राखावे

बेस्ट उपक्रमाच्या सेवेत कायम करण्यात यावे

सापत्न वागणूक न देता, मोटार ट्रान्सपोर्ट कामगार कायद्यात नमूद सर्व सोयीसुविधा देण्यात याव्यात

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in