
मुंबई : गुजरात येथील व्यापारी मित्राला कंपनीचे सुमारे २५ लाख रुपये पाठवून कंपनीच्या पैशांचा अपहार केल्याप्रकरणी एका कर्मचाऱ्याला दिडोंशी पोलिसांनी अटक केली. शाम दिनेशभाई भुत असे या कर्मचाऱ्याचे नाव असून अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. मालाड येथील प्रशांत चिमजीभाई कलसरीया यांच्याकडे शाम गेल्या चार महिन्यांपासून काम करत होता. त्याच्यावर विश्वास ठेवून पैशांची देवाणघेवाण करण्याचे काम करत होते.
२९ ऑगस्टला त्यांनी त्यांच्या कार्यालयातील लेजर अकाऊंटची तपासणी केली असता त्यात २५ लाख रुपये कमी असल्याचे दिसून आले. त्यामुळे प्रशांत यांनी शामकडे २५ लाखांविषयी विचारणा केली होती. यावेळी २९ ऑगस्टलाच राजकोट येथील एच. एम. इंटरप्रायजेस कंपनीचा मालक असलेला त्याचा मित्र विमलभाई याला ही रक्कम दिल्याचे सांगितले. अशाप्रकारे शामने त्याच्या मित्राच्या मदतीने कंपनीच्या पैशांचा अपहार केला होता. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी शामविरुद्ध दिडोंशी पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी अपहाराचा गुन्हा नोंद होताच तीन दिवसांपूर्वी शाम भुत याला पोलिसांनी अटक केली.