राज्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख शिक्षण

दुसऱ्या वर्षानंतर ॲडव्हान्स डिप्लोमा कोर्स तर तिसऱ्या वर्षानंतर बॅचलर इन व्होकेशनल एज्युकेशन हे प्रमाणपत्र मिळेल
राज्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख शिक्षण

राज्यातील बारावीच्या १५ हजार विद्यार्थ्यांना शिक्षण व रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. यासाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस सोबत नुकताच सामंजस्य करार करण्यात आला असून यासाठीच्या नोंदणीची सुरूवात येत्या १ ऑक्टोबरपासून सुरू होणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी दिली.

शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर, शालेय शिक्षण सचिव रनजितसिंह देओल, समग्र शिक्षा राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे तसेच टाटा इन्स्टिट्यूटच्या वतीने स्कूल ऑफ व्होकेशनल एज्युकेशनच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या करारानुसार या अभ्यासक्रमासाठी https://admissions.tiss.edu या संकेतस्थळावर नोंदणी करता येणार असून डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत प्रवेशाची अंतिम तारीख असेल. तर, जानेवारी २०२३ च्या दुसऱ्या आठवड्यात प्रत्यक्ष अभ्यासक्रमाची सुरूवात होणार आहे. अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना नॅशनल स्कील क्वालिफिकेशन फ्रेमवर्क आधारित प्रमाणपत्र देण्यात येईल. यामध्ये पहिल्या वर्षानंतर डिप्लोमा कोर्स, दुसऱ्या वर्षानंतर ॲडव्हान्स डिप्लोमा कोर्स तर तिसऱ्या वर्षानंतर बॅचलर इन व्होकेशनल एज्युकेशन हे प्रमाणपत्र मिळेल.

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस या नामांकित मानद विश्वविद्यालय संस्थेच्या स्कुल ऑफ व्होकेशनल एज्युकेशन या विभागाद्वारे युजीसी निकषानुसार पदविका व पदवी प्राप्त करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in